Vinayak Raut : राजन साळवींचा अभिमान असल्याचे सांगत विनायक राऊतांचा भाजपाला इशारा, म्हणाले…

Vinayak Raut : राजन साळवींचा अभिमान असल्याचे सांगत विनायक राऊतांचा भाजपाला इशारा, म्हणाले…

राजन साळवींचा अभिमान असल्याचे सांगत विनायक राऊतांचा भाजपाला इशारा, म्हणाले...

मुंबई : मागील आठवड्यात 09 जानेवारीला ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना अलिबाग ACB कार्यालयातून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसारे ते 10 जानेवारीला एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. परंतु, पुन्हा कोणत्याही कारवाईसाठी हजर राहणार नाही, जी कारवाई करायची ती करा, असे साळवी यांच्याकडून सांगण्यात आले होते. पण आज (ता. 18 जानेवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील घरी छापा टाकला आहे. एसीबीचे काही अधिकारी साळवी यांच्या घरी सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास हजर झाले आहेत. एकाच वेळी राजन साळवी यांच्याशी संबंधित असलेल्या तीन ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ठाकरे गटाला दोन दिवसांत दोन मोठे धक्के बसले आहेत. काल रात्री उशिरा आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली, त्यानंतर काही तासांतच आता राजन साळवी यांची अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Vinayak Raut warning to BJP saying that he is proud of Rajan Salvi)

हेही वाचा… Rajan Salvi : “सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार”, पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाल्याने साळवी संतापले

राजन साळवी यांच्यावर होणारी कारवाई ही राजकीय सूडातून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर छापा पडताच संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची याबाबत अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण साळवी यांना ठाकरे यांना फोन करून बातचीत केल्याची माहिती स्वतः राजन साळवी यांच्याकडून देण्यात आली आहे. पण या प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांचा अभिमान असल्याचे सांगितले आहे. तर यावेळी त्यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे.

राजन साळवी यांच्या प्रकरणाबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, ठाकरे गटाचे निष्ठावंत आणि आमदार राजन साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून आज एसीबीने छापा टाकला आहे. त्यांना एका षडयंत्रातून अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचा मी धिक्कार करतो. केवळ आणि केवळ मिंधे गटात सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने कारस्थान करून राजन साळवी यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. पण मला कितीही त्रास द्या, मी उद्धव ठाकरेंसोबत उभा आहे, असे म्हणणाऱ्या राजन साळवी यांचा अभिमान असल्याचेही विनायक राऊतांकडून सांगण्यात आले आहे.

तर, एसीबी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देत विनायक राऊत म्हणाले की, अशा पद्धतीने जर का निष्ठावंतांचे खच्चीकरण करण्याचे काम तुम्ही करत असाल तर राजन साळवी यांच्यासारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नांमधूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या निष्ठावंतांना त्रास देताना पुन्हा एकदा विचार करण्यात यावा, कितीही त्रास द्या. या तुमच्या दमनशाहीला राजन साळवी भीक घालणार नाही, असे विनायक राऊतांकडून सरकारला ठामपणे सांगण्यात आले आहे. परंतु, राजन साळवी यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून साळवी यांच्या पत्नीवर आणि मोठ्या मुलावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजन साळवी यांनी संताप व्यक्त केला आहे.

First Published on: January 18, 2024 4:37 PM
Exit mobile version