पंढरपुरातील विठ्ठल – रूक्मिणी मंदिर ३० जूनपर्यंत राहणार बंद

पंढरपुरातील विठ्ठल – रूक्मिणी मंदिर ३० जूनपर्यंत राहणार बंद

विठ्ठल- मंदिर

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी देवस्थान हे आता ३० जूनपर्यंत बंद राहणार आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर समितीने देवस्थान आणखी एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना अजून एक महिना मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. यापूर्वी देशात लॉकडाऊनचा ४.० चा कालावधी ३१ मे २०२० पर्यंत ठेवण्यात आला होता. त्यानुसार मंदिर समितीनेही ३१ मेपर्यंत भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असल्याचे १९ मे रोजी जाहीर केले होते. आता हा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

केंद्राची परवानगी मात्र राज्याचा नकार 

दरम्यान, जगभरात कोरोनाचे संकट असताना देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनचे ४ टप्पे गेल्या अडीच महिन्यात झाले आहेत. तेव्हापासून राज्यासह देशातील विविध धार्मिक स्थळे बंद आहेत. परंतू लॉकडाऊन ५.० मध्ये केंद्र सरकारने ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे खुली करण्याचे निर्देश नवीन नियमावलीमध्ये दिले आहेत. मात्र राज्याने अद्याप महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी दिली नसल्याचे ३१ मे रोजी आलेल्या नव्या नियमावलीत नमूद केले आहे. त्यामुळे केंद्राने धार्मिक स्थळांना उघडण्याची मंजुरी दिली असली तरी राज्य सरकारने ती नाकारली आहे.

इतिहासात प्रथमच वारी रद्द 

दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत निघतात. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणहून संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज या सहा प्रमुख पालख्या येतात. यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येत ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषात पंढरपूरात दाखल होतात. मात्र, इतका मोठा समुदाय एकत्र आल्यामुळे कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होऊ शकते. हा धोका लक्षात घेत यंदा वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा –

First Published on: June 1, 2020 3:46 PM
Exit mobile version