पंढरपूरला जायचंय? आता, थेट तुमच्या गावात बोलवा ‘एसटी’; आषाढी निमित्त जिल्ह्यातून २९० जादा बस

पंढरपूरला जायचंय? आता, थेट तुमच्या गावात बोलवा ‘एसटी’; आषाढी निमित्त जिल्ह्यातून २९० जादा बस

नाशिक : एखाद्या गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ पंढरपूरला जाऊ इच्छित असतील, तर त्यांच्या गावातूनच थेट बस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दर्शविली आहे. प्रवाशांची संख्या पुरेशी असेल, तर थेट पंढरपूरपर्यंतचा व तेथून पुन्हा गावापर्यंतचा प्रवास त्यांना करता येणार आहे. थेट गावांमधून बसच्या बुकिंगला देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकर्‍यांना पंढरपूर येथे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागानेही नियोजन केले आहे. नाशिक विभागातून 25 जून ते ४ जुलै या कालावधीत पंढरपूर साठी जवळपास 290 जादा बस सेवा सोडण्यात येणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी असून तीन जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे.

या काळात पंढरपूरकडे असणारी यात्रेकरुंची गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाच्या वतीने ज्यादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक एक आणि दोन आगार महामार्ग बस स्थानक मालेगावातील नवीन बस स्थानक, सटाणा, नामपुर, देवळा, तहाराबाद, मनमाड, चांदवड, सिन्नर, वावी, लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी, नांदगाव, इगतपुरी, घोटी, येवला, कळवण, वणी, पिंपळगाव बसवंत, ओझर येथून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूर येथे जाण्यासाठी 21 जूनपासून जादा बस सेवा सुरू करण्यात आले आहेत. या बससेवेला राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या 50 टक्के सवलतीचा तसेच 65 ते 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतीचा व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमार्फत मोफत प्रवास सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: June 23, 2023 5:59 PM
Exit mobile version