भिमानदीच्या खरपुडी बंधाऱ्याची दुरवस्था; पाणीटंचाईची शक्यता!

भिमानदीच्या खरपुडी बंधाऱ्याची दुरवस्था; पाणीटंचाईची शक्यता!

चासकमान धरणावरचा खरपुडी बंधारा

सध्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेती आणि पिण्यासाठी पाण्याची मागणी झाल्यानंतर नदी कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र नदी पात्रातील बंधाऱ्याची गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. पाटबंधारे विभागाकडून तात्पुरती पाणी गळती रोखण्यासाठी मलमपट्टी केली गेली. मात्र या प्रयत्नात भिमानदीवरील खरपुडी येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं विदारक दृश्य दिसत आहे.

जीर्ण झालेले लोखंडी ढापे

काही दिवसांपूर्वी चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा पाण्याने तुडुंब भरला आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक मलघेवाडी, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म) या परिसरातील शेतकरी शेकडो हेक्टर क्षेत्रावर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिके घेत असतो. अवघ्या महिन्याभरापूर्वी या बंधाऱ्याला लोखंडी ढापे बसवण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाकडून यंदा काळजीपूर्वक लोखंडी ढापे बसवण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी तर जीर्ण झालेले ढापे बसवण्यात आल्याचं दिसून येत आहे.

पाण्याची गळती थांबेना!

गेल्या वीस वर्षांपासून सतत पाण्यात राहिल्याने या लोखंडी ढाप्यांना गंज चढला आहे. तसेच पत्रा सडला असून मोठी मोठी छिद्रं पडली आहेत. त्यातून पाणी जास्त वेगाने विसर्ग होत आहे. तसेच काही ठिकाणी बंधाऱ्यांच्या गाळ्यांचे दगड निखळले आहे. पाटबंधारे विभागाने मागील वर्षी सत्तर लोखंडी ढापे नवीन आणले होते. पण ते अपूर्ण ठरले. यंदा पाटबंधारे विभागाने नवीन आणि जुने ढापे पुन्हा बसवले. मात्र जीर्ण झालेल्या ढाप्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – पुण्यात पाणीकपात सुरु ; शहराला प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर पाणी देणार

पाणी रोखण्यासाठी लावले प्लास्टिक!

मागील आठवड्यात बंधाऱ्याचा एक ढापा पाण्याचा दाब वाढल्याने निखळला होता. त्या निखळलेल्या ढाप्याद्वारे २ दिवस लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाने घाई घाईने या ढाप्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंधाऱ्याच्या एका गाळ्याला पोत्यात झाडपाल्याची पाने घालून ही पोती निखळलेल्या ढाप्याला लावण्यात आली. मात्र गळती थांबली नाही. या बंधाऱ्याला टाकलेल्या सर्व गाळ्यातील ढाप्यांतून पाण्याची गळती सुरू आहे. एका ठिकाणी अक्षरश: प्लास्टिकचा कागद लावण्यात आला आहे. लोखंडी ढापे बसवण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंटही पाण्याने ओघळून गेले आहे. तसेच काही ठिकाणी गाळ्यांचे दगड निखळले असून त्याद्वारे ही पाण्याची गळती सुरू आहे.

हजारो लिटर पाण्याची नासाडी

या सगळ्या प्रकारामुळे रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. या बंधाऱ्याला पाणी पाठवण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने सुस्थितीत असलेले ढापे बंधाऱ्याच्या खालच्या भागात बसवणे गरजेचे होते. मात्र ढिसाळ कारभारामुळे ढापे व्यवस्थित बसवण्यात आलेले नाही. ही गळती अशीच सुरू राहिली, तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने चासकमान धरणाचेही पाणी मिळेल की, नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

First Published on: November 17, 2018 8:06 PM
Exit mobile version