ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट?

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट?

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्यावर्षापेक्षाही यंदा पाण्याची पातळी घसरली आहे. दरवर्षी १५ जूलैपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे पाण्याची पातळी अशीच कमी होत राहिली तर पाणी कपात जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार येऊन ठेपली आहे.

धरणासाठी ११६३ लोकांचे होणार पुनर्वसन

ठाणे लघुपाटबंधारे विभागाकडूनच पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसारच पाणी कपात जाहीर केली जाते. बारवी धरणात ६८.६० मीटर ही ओव्हरफ्लो मर्यादा आहे. सध्या ५९.०३ मीटर म्हणजेच ९९.०९ दशलक्षघनीमटर इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातच धरणात ६१.१० मीटरपर्यंत पाणीसाठा होता. गेल्यावर्षीपेक्षा यंदा १० टक्केत पाण्याची पातळी घटली आहे. प्रचंड उन्हामुळेच पातळीत घट झाल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. अडीच महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी घटल्यास पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट उभं राहू शकतं. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे तोंडली, मोहघर, संलग्न पाडे, काचकोळी, कोळीवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या सहा गावातील सुमारे ११६३ लोकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. जून अखेर धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण होऊन बारवी धरणात ३४०.८६ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on: April 12, 2019 10:04 PM
Exit mobile version