आपली बाजू कायदेशीररीत्या मांडणार – इंदुरीकर महाराज

आपली बाजू कायदेशीररीत्या मांडणार – इंदुरीकर महाराज

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज

इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ केलेल्या चलो नगरच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आता नवे आवाहन करण्यात आले आहे. आपण कोणीही कुठेही मोर्चा, रॅली काढू नका. तसेच एका ठिकाणी जमून कोणतेही आंदोलन करू नका किंवा कोणालाही निवेदन देऊ नका असे आवाहन त्यांनी आता केले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांनी हे आवाहन समर्थकांना एका पत्राच्या माध्यमातून केले आहे.

शांततेचे आवाहन करणारे इंदुरीकर महाराज यांचे पत्र

वाकरी संप्रदाय शांतताप्रिय 

चलो नगर म्हणून सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. पण आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. म्हणूनच आपण आपली बाजू ही कायदेशीररीत्या आणि शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत अशीही भूमिका त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. शांतता राखा आणि सहकार्य करा असेही आवाहन त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केले आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे युट्युबवर अपलोड झालेल्या एका वादग्रस्त व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहेत. एकाबाजुला पुत्रप्राप्तीचे विधान केल्याबद्दल आरोग्य विभागाची नोटीस, महिला वर्गाची नाराजी आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा रोष ओढवून घेतला असताना दुसऱ्या बाजुला इंदुरीकर महाराजांचे समर्थकही मैदानात उतरले आहेत. नुकत्याच नगरमध्ये झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात महाराजांनी चक्क बाउन्सरची मदत घेतली. या बाउन्सरच्या बंदोबस्तातच ते कीर्तनाच्या ठिकाणी आले. यावेळी त्यांच्या कीर्तनाचे रेकॉर्डिंग करण्यास बंदी घालण्यात आली होती.

First Published on: February 17, 2020 12:27 PM
Exit mobile version