सीएमओचा सावध पवित्रा! परमबीर सिंह यांच्या स्वाक्षरी नसलेल्या पत्राबाबत करणार शहानिशा

सीएमओचा सावध पवित्रा! परमबीर सिंह यांच्या स्वाक्षरी नसलेल्या पत्राबाबत करणार शहानिशा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एक खळबळजनक खुलासा केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रात केला आहे. मात्र, या पत्रावर परमबीर सिंह यांची स्वाक्षरी नसून ते पत्र नक्की त्यांनीच लिहिले याची शहानिशा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सिंह यांनी ज्या ई-मेल पत्त्यावरून हे पत्र पाठवले त्यात आणि त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेल्या ई-मेल पत्त्यात फरक असल्याचेही सांगण्यात आले.

पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंह यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर शनिवारी दुपारी ४ वाजून ३७ मिनिटांनी पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ई-मेल पत्त्यावरून परमबीर सिंह असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंह यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सीएमओकडून सांगण्यात आले. तसेच परमबीर सिंह यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ई-मेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ई-मेल तपासून घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले.

First Published on: March 20, 2021 10:32 PM
Exit mobile version