Lockdown : आम्ही कामावर येतो, आधी वाहतुकीची व्यवस्था करा!

Lockdown : आम्ही कामावर येतो, आधी वाहतुकीची व्यवस्था करा!

महानगरपालिकेने ५० टक्के उपस्थितीबाबत बिगर अत्यावश्यक व आपत्कालिन सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या परिपत्रकावरून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर खात्यांमधील तसेच विभागांमधील महापालिकेच्या कामगार, कर्मचाऱ्यांनी आपण महापालिका आयुक्तांचे आदेश मानायला तयार असून आधी सर्व कर्मचाऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. आधीच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील कामगार, कर्मचाऱ्यांना वाहनांची सुविधा अजुनही नाही. त्याबाबत आयुक्तांच्या स्तरावर चिंता तथा तक्रार करून त्यांना सुविधा पुरवली जात नाही. त्यामुळे या गैरसोयीत आमच्या माध्यमातून अधिक भर पाडण्याचा प्रयत्न आयुक्तांनी करू नये, अशीच भावना सर्व कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने एक दिवसा आड कामगारांना सेवेत बोलावून ५० टक्के उपस्थिती राखण्यासंदर्भात  मार्च महिन्यात परिपत्रक जारी केले होते. मात्र, हे परिपत्रक प्रशासनाने कायमच ठेवले असून आता पुन्हा याबाबतच्या परिपत्रकाचा आधार घेत सुधारीत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे  ज्या कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असेल त्यांनाच पूर्ण पगार निघेल आणि ज्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल, त्यांचे वेतन उपस्थितीनुसार काढले जाईल, असे त्यात नमुद केले. त्यामुळे लॉकडाऊनमुळे घरी अडकून पडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मात्र, याबाबत कामगार, कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजही आम्ही स्वखुशीन घरी बसलेलो नाही. आज वाहतूक सुरु आहे, त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे आयुक्तांनी, सरसकट सर्वच महापालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याबाबतचे आदेश  दिले जावेत. तसेच कमी कर्मचाऱ्यांअभावी बेस्टच्या बसेच कमी धावत आहेत. त्यातच ट्रेन बंद आहेत. त्यामुळे कामावर यायचे कसे याचीही माहिती व शेड्युल्ड महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने जाहीर करावे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचाऱ्यांची वाहनाअभावी गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासन तसेच सरकार ही समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे, तर मग आम्ही सर्व कामगार कामावर आल्यास ही समस्या अधिकच वाढणार असल्याची भीती कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आमच्यापेक्षा अत्यावश्यक व आपत्कालिन विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांची सेवा महत्वाची आहे. इतर विभागातील कामगार, अत्यावश्यक सेवेतील कामगारांप्रमाणे कामही करू शकणार नाही. कारण प्रत्येकाचे काम वेगळे आहे. मग सरसकट ५० टक्के कामगारांनी सेवेत येण्याचे अट्टाहास का असा सवालही त्यांनी केला.

याबाबत दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र पाठवून करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणातयेत नाही, तोवर महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी यांच्या वेतनात कपात न करता पूर्ण वेतन दिले जावे, अशी मागणी केली आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीची सर्व यंत्रणा कोलमडून पडलेली आहे. त्यामुळे इच्छा असूनही कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित राहू शकत नाही. प्रशासनाला वारंवार विनंती केल्यानंतर काही ठिकाणी प्रवासाची सोय करण्यात आली आहे. परंतु ती सुविधाही अपुरी आहे. तसेच घरापासून या ठिकाणी पोहोचण्याची सोय नाही. जे कर्मचारी मुलुंड, बोरीवली व मानखुर्दच्या पुढे वास्तव्यास आहेत, त्यांना प्रवासाच्या साधनाअभावी आजही कर्तव्यावर उपस्थित राहणे अशक्य असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

First Published on: April 9, 2020 2:15 PM
Exit mobile version