कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“विकासात्मक कामाच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली.

म्हाडा आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी कोरोनाशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय महत्त्वाचा आहे . क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग, ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. सर्व यंत्रणांनी मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.
कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णाची योग्य कळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाचीअसून यामध्ये हयगय अथवा दुर्लक्ष होता कामा नये. या बाबीवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल. परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत सदैव जागरुक राहून नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

First Published on: August 3, 2020 8:06 PM
Exit mobile version