धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, कायद्याचा दाखला देत मुख्यमंत्री शिंदेंचा ठाम दावा

धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, कायद्याचा दाखला देत मुख्यमंत्री शिंदेंचा ठाम दावा

मुंबई – धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात दुफळी माजली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. मात्र, येत्या काळात धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा ठाम दावा करतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “आम्हाला निवडणूक चिन्हाबाबत कुणाला काहीच सांगण्याची गरज नाही. मेरिटच्या जोरावर ते आम्हालाच मिळेल. अंधेरीची पोटनिवडणूक लागली म्हणून निवडणूक आयोगाला निर्णय घेता आला नाही. पण आगामी काळात धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. याचं कारण म्हणजे ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मतांची आकडेवारी ३९ लाख इतकी आहे. तसंच १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी ६९ लाख इतकी आहे. म्हणजेच पक्षाला पडलेल्या एकूण मतांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मतं आमच्याबाजूनं आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकशाहीत बहुमताला मान असतो. धनुष्यबाण चिन्ह यानुसार आम्हालाच दिलं जाईल आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सन्मान होईल.”

ठाकरेंनी चारवेळ वेळकाढूपणा केला

शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू असतानाच शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर पुन्हा दावा केला. “मेरिटच्या जोरावर धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. मी कालपासून बघतोय आमच्यावर अन्याय झाला असा गळा काढला जात आहे. धनुष्यबाण गोठवण्याच्या निर्णयाला आम्हाला जबाबदार धरलं जात आहे. पण खरंतर तेच लोक या निर्णयाला जबाबदार आहेत. कारण निवडणूक आयोगानं वारंवार संधी दिली. कागदपत्र मागितली पण त्यांनी वेळकाढूपणा केला. चार वेळा वेळ वाढवून मागितली. मला कालच समजलं की जी शपथपत्र दिली गेली ती बोगस आहेत. पोलिसांनी तशी कारवाई केली आहे. वेळकाढूपणा केल्यामुळेच चिन्ह गोठवण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली”, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

First Published on: October 11, 2022 10:10 PM
Exit mobile version