शिवनेरीच्या विकास कामासाठी २३ कोटींचा निधी देणार – अजित पवार

शिवनेरीच्या विकास कामासाठी २३ कोटींचा निधी देणार – अजित पवार

किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरीता तेवीस कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. शिवजयंती उत्सव कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसारखे अनेक प्रमुख यावेळी उपस्थिती होती.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्ह्याचा ६५० कोटीचा वार्षिक आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी परिसर विकासासाठी २३ कोटीचा निधी दिला जाईल. राज्याच्या आगामी अर्थ संकल्पात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. शालेय शिक्षण, आंगणवाडया, आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’ असल्याचे पवार म्हणाले. तसेच वयस्कांच्या सोयीसाठी रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल असे कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संर्वधन महत्त्वाचे आहे. बॉस्टन विद्यापीठात ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ अशी १०० गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठ्यपुस्तकांतून महाराजांवरील गौरवपर धड्याचा समावेश ही शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब” असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. तर वयस्कर लोकांना शिवनेरीवर येण्यासाठी रोपवे उभारण्याची व शिवनेरीवर शिवसंस्कार सृष्टी उभारण्याची मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनकेंनी केली आहे.

कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते माजी सहायक पोलिस आयुक्त असलेले वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार तर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अपर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

First Published on: February 19, 2020 7:46 PM
Exit mobile version