Weather Alert : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट, पुढील ३ दिवस कोकण मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

Weather Alert : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट, पुढील ३ दिवस कोकण मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

IMD alerts maharashtra rain forecast : राज्यात काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली, अशातच आता सर्वत्र अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी याचा फटका आता महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यांवरही अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. यामुळे आता बळीराजा संकटात सापडला आहे. उभे काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.

दिवाळीदरम्यानही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र समुद्र किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र दूर सरकल्य़ाने कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव जाणवला नाही. मात्र पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र राज्याच्या किनारपट्टी भागाकडे सरकल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात स्ट्रॉबेरी पिकाचे नुकसान

दरम्य़ान मंगळवारी दुपारपासून विविध भागांत अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, सातारा, पुणे अशा अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात तब्बल दोन तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे महाबळेश्वर पाचगणीमधील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे.

कोकणातील आंबाही होणार खराब

याशिवाय कोकणातही पावसामुळे आंब्याच्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, खेड येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली असून दापोली, मंडणगड भागातही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला; तर चिपळूण, संगमेश्‍वरसह लांजा-राजापुरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.


 

First Published on: November 17, 2021 8:52 AM
Exit mobile version