परमबीर सिंह यांनी काय लिहिले होते पत्रात? ज्यामुळे गृहमंत्री देशमुखांना जावे लागले जेलात

परमबीर सिंह यांनी काय लिहिले होते पत्रात? ज्यामुळे गृहमंत्री देशमुखांना जावे लागले जेलात

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता वाचल्यानंतर या सरकारने आज मोठा निर्णय घेत महाविकास आघाडी सरकारले दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना त्यांनी निंलबित केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आलेले आहे. यामुळे महाविकास आघाडीला या निर्णयाच्या माध्यमातून मोठा दणका देण्यात आलेला आहे. पण 2021 मध्ये परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारला पाठवलेल्या एका लेटरमुळे मोठी खळबळ माजली होती. ज्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी देखील करण्यात आलेली होती. परमबीर सिंह यांनी त्यांच्या या पत्रामध्ये नेमके काय लिहिले होते, (What did Parambir Singh write in the letter) ज्यामुळे खळबळ माजली होती आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना 11 महिन्यांसाठी कारागृहाची हवा खावी लागली होती.

परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये लिहिलेल्या पत्रातील मुद्दे
भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील 32 वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठिशी उभे राहा.

हेही वाचा – Breaking News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

IPS परमबीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात त्यावेळी लिहिले होते की, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असे माझ्या त्यावेळी लक्षात आले.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले गेले. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुख यांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर 100 कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुख यांनी सांगितले. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेसकडून जमा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल माहिती दिली. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बोलवून हुक्का पार्लरविषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आले. त्यावेळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 40-50 कोटी रुपये 1750 बार, हॉटेल मधून जमा होतील, असे सांगितले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असं परमबीर सिंह यांनी त्यावेळी त्यांच्या पत्रात लिहिले होते, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि अनिल देशमुख हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले.

देशमुख यांचा भ्रष्ट कारभार पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजेत आला होता. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळी अनेक आरोप देखील केले होते. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे त्यांनी त्यावेळी त्यांच्या पत्रात लिहिले होते.

First Published on: May 12, 2023 5:24 PM
Exit mobile version