मुंबईला अर्थसंकल्पातून काय ?

मुंबईला अर्थसंकल्पातून काय ?

अर्थसंकल्प २०-२१

मुंबईतील बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मोठी घोषणा करण्यात आली. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये मुद्रांक शुल्कात १ टक्का कपात करण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केला. त्यासोबतच वरळीत जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्याचीही घोषणा करण्यात आली. मुंबईत मराठी भाषा विकासासाठी मराठी भाषा भवनाची उभारणा करण्याचेही आज प्रस्तावित करण्यात आले. तसेच मुंबईतील सागरी वाहतुकीच्या निमित्तानेही अर्थसहाय्याची घोषणा करण्यात आली.

मुंबईत मराठी भाषेच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन बांधणार. तसेच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यासाठी ११८.१६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच एशियाटिक सोसायटीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील रो रो वाहतुकीअंतर्गत कुलाबा जेट्टी उभारण्यासाठी ५० कोटी रूपये आजच्या अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आले. सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत प्रवासी कुलाबा जेटीसाठी हे ५० कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थित तरतूद ही पर्यटन विभागासाठी जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन खात्याच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून १४०० कोटी रूपये मंजुर झाले आहेत. या निधीच्या माध्यमातून मुंबईत वरळी येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई सोबतच मुरूड जंजिरा सुशोभिकरण, सज्जनगड ते पायथा असा परळीतील रोप वे प्रस्तावित करण्यात आला आहे. पर्यटन विकासासाठी मनुष्य बळ तयार व्हावे यासाठी खास अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.

First Published on: March 6, 2020 12:34 PM
Exit mobile version