२०४ ‘सुट्ट्या’ घेऊन महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल, वॉट्स एप ‘व्हायरल’ फॉरवर्ड मॅसेज

२०४ ‘सुट्ट्या’ घेऊन महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल, वॉट्स एप ‘व्हायरल’ फॉरवर्ड मॅसेज

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २९ जानेवारीपासून ५ दिवसांचा आठवडा सुरू करण्याचा निर्णय लागू होणार आहे.

महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांना उद्यापासून पाच दिवसांचा आठवडा सुरूवात होत आहे. पण संपुर्ण वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकुण २०४ सुट्ट्या मिळतात, महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल होत आहे असा वॉट्स एप मॅसेज सध्या वॉट्स एपवर अतिशय व्हायरल होत आहे. वर्षाचे ३६५ दिवस त्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांचे सुट्ट्यांचे २०४ दिवस असाच या वॉट्स एप मॅसेजचा रोख आहे. एकुणच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांमध्ये असणारा त्यांच्या कामाच्या निमित्ताने असणारा रोष थोड्या गमतीदार कमेंटसह या मॅसेजच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मात्र मॅसेजचा हा रोख अतिशय चुकीचा असल्याची भूमिका मांडली आहे.

वॉट्स एपवर व्हायरल मॅसेज

राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी सुट्टी असणार आहे. मात्र दररोज 45 मिनिटांचे वाढीव काम अधिकारी आणि कर्मचार्‍यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या म्हणजे 29 फेब्रुवारीपासून होणार आहे. पण शासकीय कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे रोजचे कामाचे तास मात्र वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये तसेच अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 होतात. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षातील कामाचे तास 2088 इतके होतात. पाच दिवसांच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. परिणामत: एका महिन्यातील कामाचे तास 176 तर वर्षातील कामाचे तास 2112 इतके होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे, प्रतिमहिना 2 तास आणि प्रतिवर्ष 24 तास इतके कामाचे तास वाढतील.

२०४ दिवसांच्या सुट्ट्यांचे कॅलक्युलेटर

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना वर्षातील ५२ रविवार दिवस सुटी असते. आता त्यामध्ये ५२ शनिवारची भर पडणार आहे. त्याशिवाय सणाच्या सरासरी सुट्ट्या या 20 दिवस असतात. तर दरवर्षीच्या सुट्ट्यांमध्ये १५ किरकोळ रजा, ३० भरपगारी रजा, २० वैद्यकीय सुट्ट्या, १५ विशेष सुट्ट्या अशा एकुण २०४ दिवसांच्या सुट्ट्या आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. तसा शासन निर्णय मंजुर झाला आहे.

अर्ध्या तासाचाच लंच

सध्या बृहन्मुंबईतील सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायं. 5.30 अशी आहे. ती आता सकाळी 9.45 ते सायं.6.15 अशी होईल. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायं.6.30 अशी राहील. बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी 10.00 ते सायं. 5.45 अशी कामाची वेळ सध्या आहे. ही वेळ आता सकाळी 9.45 ते सायं.6.15 अशी राहील. आता पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व राज्य सरकारी कार्यालयांना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे.

सुट्ट्यांसह कामाचे तासही वाढले आहेत

बॅंका तसेच केंद्रातील विविध विभागांना पाच दिवसांचा आठवडा गेल्या अनेक वर्षांपासून लागू आहे. त्याबाबत कोणीही बोलत नाही. पण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. आमची गेल्या अनेक वर्षांची मागणी प्रलंबित होती. त्यामुळे दिसताना सुट्ट्या जरी जास्त दिसत असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र रोजचे कामाचे तास वाढले आहेत असे स्पष्टीकरण राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्रचे प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे यांनी दिले आहे.

First Published on: February 28, 2020 1:18 PM
Exit mobile version