जेव्हा मुख्यमंत्री शिंदे बळीराजाच्या रूपातील विठू रखुमाईच्या पाया पडतात

जेव्हा मुख्यमंत्री शिंदे बळीराजाच्या रूपातील विठू रखुमाईच्या पाया पडतात

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.

पांडुरंगाच्या शासकीय पूजेनंतर बळीराजाचे रूप असलेल्या मानाच्या वारकरी जोडप्याचा सन्मान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक पूजा संपन्न झाल्यावर आपला बडेजाव बाजूला ठेवून या मानाच्या वारकरी जोडप्याचे पाय धरले. बळीराजाच्या रुपात भेटलेल्या ह्या विठोबा आणि रखुमाईचे पाय धरून त्यांनी त्यांचे मनापासून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून नवले दाम्पत्यदेखील क्षणभर स्तब्ध झाले.

यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या नवले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठू रखुमाईची सुरेख मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. तसेच एसटीच्या वतीने विनामूल्य प्रवासासाठी एक विशेष पासही देण्यात आला. मात्र आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी दाखवलेला हा साधेपणा उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे. विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे. तसेच, मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते.


हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा

First Published on: July 10, 2022 2:53 PM
Exit mobile version