Maharashtra Corona Update: आणखी काही राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण, कोणाला संसर्ग? वाचा

Maharashtra Corona Update: आणखी काही राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण, कोणाला संसर्ग? वाचा

Maharashtra Corona Update: आणखी काही राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण, कोणाला संसर्ग ? वाचा

महाराष्ट्रातील कोरोनाचा वेगाने वाढणारा फैलाव दिवसेंदिवस अधिकाधिक चिंता वाढवत आहे. आज राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्येत उच्चांकी वाढ झाली आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार ५३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १४४ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील आज अनेक नेतेमंडळी आणि त्यांच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज राज्यातील कोणकोणते नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळले जाणून घ्या.

प्रविण दरेकरांना कोरोनाची लागण

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांनी याबाबतची माहिती स्वतः ट्वीट करून संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. प्रविण दरेकर म्हणाले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.’

संजय राऊतांच्या कुटुंबातील ४ जण आढळले पॉझिटिव्ह

त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. राऊतांच्या कुटुंबातील ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राऊतांची आई, मुलगी, पत्नी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहेत. दरम्यान संजय राऊतांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे.

रुपाली चाकणकर यांचा झाला कोरोनाचा संसर्ग

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.’

यशवंत जाधव आढळले कोरोनाबाधित

मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या अशा स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांना कोविडची बाधा झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यांना माझगाव येथील प्रिन्स अली खान या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती यशवंत जाधव यांनी स्वतः सोशल मीडियावर मेसेज आणि अहवाल पाठवून दिली आहे. तसेच, गेल्या २ – ३ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत हे नुकतेच कोविडबाधित आढळून आले असून यशवंत जाधव हे एका कार्यक्रमात एकत्रित आले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, यशवंत जाधव यांचे सहाय्यकसुद्धा कोविडबाधित आढळून आले आहेत. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. मात्र कोविड बाधित असतांनाही यशवंत जाधव यांनी आज स्थायी समितीची ऑनलाइन बैठक घेतली. मात्र दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ आणि भाजप आमदार आर. एन. सिंह यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पित करून या बैठकीत नियमित कामकाज न करता बैठक तहकुब करण्यात आली.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ; ओमिक्रॉनबाधितांची सेंच्युरी


 

First Published on: January 5, 2022 9:48 PM
Exit mobile version