१५ वर्षांचा थंडीचा रेकॉर्ड मोडला

१५ वर्षांचा थंडीचा रेकॉर्ड मोडला

गेल्या तीन ते चार दिवसांपासून शीत लहरीमुळे तापमानात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे यावर्षातील डिसेंबर महिन्याच्या थंडीने १५ वर्षांतील सर्वच रेकॉड तोडले आहे. शनिवारी ३० डिसेंबरला आजपर्यतच्या मोसमातील अत्यल्प ५.१ या तापमानाची नोंद जलविज्ञान प्रकल्प विभागात करण्यात आली आहे. ५ जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

२८ ते २९ डिसेंबरपासून विदर्भात तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे अमरावतीमध्ये देखील शुक्रवारपासूनच हुडहूडी सुरू झाली. शनिवार, रविवारी तर यात आणखी भर पडली. त्यामुळे दिवसा थंडीची हुडहूडी वाढल्याने याचा परिणाम वृध्द आणि लहान मुलांवर अधिक जाणवला. वर्षामध्ये सर्वात कमी तापमान डिसेंबरमध्ये १० डिग्रीच्या आत राहते. अमरावतीत जलविज्ञान प्रकल्पाची स्थापना २००३ ला झाल्यानंतर या १५ वर्षात डिसेंबर महिन्यातील तापमान ९ ते ७ डिग्रीपर्यंत घसरले आहे. २००५ मधील डिसेंबर महिना ६.५ डिग्रीपर्यंत खाली आला होता. हे रेकॉर्ड तोडत यावर्षीच्या डिसेंबरमध्ये १५ वर्षांत सर्वात की ५.१ तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे १५ वर्षांतील ३० डिसेंबर हा सर्वात शीत दिवस ठरला आहे. ही थंडीची लाट ५ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे.

First Published on: January 2, 2019 3:55 PM
Exit mobile version