पुण्यात पुन्हा जादूटोणा; मूल होत नाही म्हणून खाऊ घातली मानवी हाडांची राख

पुण्यात पुन्हा जादूटोणा; मूल होत नाही म्हणून खाऊ घातली मानवी हाडांची राख

पुणेः मूल होत नाही म्हणून महिलेला सासरच्यांनी मानवी हाडांची राख खाऊ घातल्याची धक्कादायक घटना पुणे येथील धायरी परिसरात घडली आहे. राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना याबाबत तातडीने कारवाई करणायचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. जागतिक शहर अशी पुण्याची ओळख आहे. तेथे असा अघोरी प्रकार घडावा हे निंदनीय व अमानवी आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश सिंहगड पोलिसांना दिले आहेत, असे आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पीडित महिलेला मूल होत नव्हते. त्यामुळे सासरचे तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. मारहाण व शिवीगाळ करायचे. सन २०१९ पासून हा प्रकार सुरु होता. घरात सुख शांती यावी. भरभराट व्हावी. मूल व्हावे म्हणून सासरच्यांनी अघोरी पुजा केली होती. त्यावेळी पीडित महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातली होती. अखेर महिलेने पोलिसांत याची तक्रार दिली. पोलिसांनी सासरच्यांविरोधात गुन्हा नोंदवला. पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, मागील अमवस्येच्या दुसऱ्या दिवशी पुणे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत चित्तेजवळ दोन तृतीयपंथीयांनी पुजा केली असल्याची घटना घडली होती. मध्यरात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन तृतीयपंथीय चित्तेजवळ आले. त्यांनी तेथे पुजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते पुजेचे साहित्य घेऊन आले होते. पुजा करताना स्मशानभूमी कर्मचाऱ्याने त्यांना बघितले. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तृतीयपंथीयांना अटक केली. यातील एक तृतीयपंथीय मुंबईतला आहे व दुसरा पुण्यातील आहे.

त्यानंतर आता महिलेला मूल होत नाही म्हणून मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे येथे अशा घटना होत असल्याने त्याला आळा घालण्याची मागणी होत आहे.

First Published on: January 20, 2023 1:35 PM
Exit mobile version