शेतात लपवलेल्या गावठी बंदुकीची गोळी लागून महिला जखमी

शेतात लपवलेल्या गावठी बंदुकीची गोळी लागून महिला जखमी

शेतात लपवून ठेवलेल्या गावठी बंदुकीची गोळी लागून महिला जखमी झाली. दर्शना महाले असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील कुदे या गावात ही घटना घडली. बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे.

कुदे गावातील लक्ष्मण पाटील यांच्या शेतात गुरूवार, २ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राब भाजण्यासाठी पाला पाचोळा गोळा करीत होते. दर्शना महाले या देखील शेतात काम करीत होत्या. या शेतात पाला पाचोळ्या मध्ये कुणीतरी अज्ञात इसमाने गावठी ठासणीची बंदूक बार भरून लपवून ठेवली होती. पाला – पाचोळा गोळा करताना हातातील कोयता या बंदुकीच्या स्ट्रीगरला लागला. त्यामुळे बंदुकीतील गोळी सुटून दर्शना महाले यांच्या पायाला लागली. यात त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात शस्त्र अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बंदूक पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास रेवदंडा पोलीस निरीक्षक जैतापूरकर करीत आहेत.

First Published on: May 3, 2019 7:54 PM
Exit mobile version