ऊन, पावसाने पुणेकर हैराण

ऊन, पावसाने पुणेकर हैराण

गेल्या आठवड्यापासून पुण्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. शहरात आभाळ भरुन येत असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. काही मिनिटांच्या पावसातच रस्ते जलमय होत आहेत. यात पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

रविवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आजही पावसाने अर्धा तास चांगलीच बॅटींग केली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सकाळच्या सुमारास चांगलेच ऊन पडत असल्याने नागरिक रेणकोट छत्र्या सोबत घेऊन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अडोशाचा शोध घ्यावा लागत आहे. सकाळी कडक ऊन तर दुपारनंतर मुसळधार पाऊस अशा दोन्ही ऋतुंचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत.

परतीच्या पावसाला सुरु झाला असल्याने विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे पुण्यातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पावसाचा तडाखा कमी झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यात आला. येत्या काही दिवसांत असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on: October 2, 2018 12:37 AM
Exit mobile version