LockDown : वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ गरजेचे!

LockDown : वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ गरजेचे!

लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरात वायू प्रदुषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. नागरिकांनी वर्क फ्रॉम होमचे मॉडेल अवलंबल्याने हे देशपातळीवर शक्य झाले आहे. म्हणूनच आगामी कालावधीतही सरकारमार्फत वायू प्रदुषण कमी करण्यासाठी वर्क फ्रॉम होमची पद्धत सातत्याने आणि मोठ्या पातळीवर अंमलात आणण्याची गरज आहे, असे मत अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव डॉ. एम राजीवन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वायू प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होईल अशी सूचना त्यांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केली आहे.

लॉकडाऊनमुळे वायू प्रदुषणाची पातळी कमी होण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे लोकांना श्वासोश्वासाचे विकार कमी होण्यासाठीही मदत झाली आहे. जर वायू प्रदुषण कमी झाले नसते तर आणखी आजार आणि जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले असते असेही ते म्हणाले. शहरी भागात वाहतूक आणि औद्योगिक गोष्टींमुळे वायू प्रदुषणात मोठ्या प्रमाणात भर पडते. म्हणूनच आताचा लॉकडाऊनचा कालावधी हा वायू प्रदुषणाच्या निमित्ताने अभ्यास करण्यासाठीची उत्तम संधी आहे, असेही त्यांनी नमुद केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात काही वेधशाळेच्या नोंदी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. नियमित पद्धतीने ज्या नोंदी वेधशाळेमार्फत घेण्यात येतात त्यामध्येही घट झालेली आहे. त्यामुळेच आगामी कालावधी ऑटोमॅटिक पद्धतीने या नोंदी घेणे हे आव्हान असणार आहे. तसेच या नोंदी विश्वासार्ह कशा असतील या गोष्टींचीही दखल घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पारंपारिक नोंदी घेण्याच्या पद्धतीऐवजी आगामी काळात ऑटोमॅटिक नोंदीसाठी काय प्रणाली विकसित करता येईल हा लॉकडाऊनमधून घेतलेला धडा आहे असे ते म्हणाले.

First Published on: April 22, 2020 11:15 PM
Exit mobile version