शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका बकाल – राज ठाकरे

शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका बकाल – राज ठाकरे

प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तत्पुर्वी औरंगाबाद येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी औरंगाबादच्या कचरा समस्येवर पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, “शिवसनेची सत्ता ज्या ज्या महापालिकांमध्ये आहे. ती शहरे बकाल झाली आहेत. मुंबईतही अनेक नागरी समस्या उभ्या राहिल्या आहेत. मनसेच्या हातात नाशिक मनपा होती, त्याकाळात आम्ही कचरा व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले होते. नाशिकमध्ये घंटा गाड्या जीपीएसने जोडलेल्या आहेत. इतर पक्षांनी मात्र महापालिकेची सत्ता फक्त खाण्यासाठी वापरली आहे.”

शिवसेनेच्या हातात औरंगाबाद महापालिकेचे सत्ता दिली आहे. त्यांना कचऱ्याच्या समस्येविषयी प्रश्न का विचारत नाही? असाही प्रतिसवाल ठाकरे यांनी पत्रकारांना विचारला. मुंबईतही शिवसेनेची सत्ता असूनही आम्ही जशी नाशिकमध्ये सुविधा दिली तशी मुंबईतदेखील नाही, असही ठाकरे म्हणाले.

भाजपचे पुन्हा सत्तेवर येणार नाही

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण व्हायला लागले आहे. त्यामुळे भाजप आणि माध्यमांकडून नरेंद्र मोदींना पर्याय काय? अशा प्रश्न विचारला जातो. राज ठाकरे यांना सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेत असाच प्रश्न विचारला गेला. यावर ठाकरे यांनी आपल्या शैलीत टीका केली. ठाकरे म्हणाले, “आजवर कोणत्या पंतप्रधानाला पर्याय विचारला गेला होता का? पंडित नेहरू यांच्यानंतर एकापेक्षा एक पंतप्रधान भारतात होऊन गेले. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना पर्याय विचारला गेला होता का? मग आताच असे प्रश्न का विचारले जात आहेत.” तसेच ते म्हणाले की, मोदींना पंतप्रधानपदी असायला हवे असे बोलणारा मी पहिलाच राजकीय पुढारी होतो, पण आता ते नकोत असे म्हणणारा देखील मीच आहे.

First Published on: July 19, 2018 4:38 PM
Exit mobile version