डोंबिवलीतून साडेआठ लाखाचा गावठी दारू साठा जप्त

डोंबिवलीतून साडेआठ लाखाचा गावठी दारू साठा जप्त

दारू साठा जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी शिरढोण गावातून तब्बल साडेआठ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त केला आहे. तसेच  गुन्हेगारी कारवाई करणा-यांवर पोलिसांची करडी नजर असून,  आतापर्यंत ४२ जणांना ठाणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच ३ गावठी कट्टे आणि ३७ हत्यारेही जप्त केली आहेत. आतापर्यंत दारूबंदीच्या एकूण ११८ केसेस दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती कल्याण पोलीस परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या हातभट्टी, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही याबबात निवडणूक आयेागाकडून पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेतली जात आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरढोण गावातील जंगलात नाल्याच्याशेजारी गावठी दारूची हातभट्टी असून  विष्णु हरी पाटील नावाचा इसम हातभट्टीची दारू गाळत  असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी सात वाजता छापा टाकून  गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची हातभट्टी उध्दवस्त केली.

पोलिसांची कूणकूण लागताच विष्णु पाटील याच्यासह ७ जण फरार झाले. पोलिसांनी या  कारवाईत  सुमारे ८ लाख ३३ हजार ९०० रूपयांचे दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.  आतापर्यंतची हीसर्वात मोठी कारवाई असून  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस परिमंडळ ३ च्या कार्यक्षेत्रात एकूण आठ पाेलीस ठाणी येतात. कल्याण आणि भिवंडी या  दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो.  त्यामुळे दोन्ही मतदारसंघात कायदा सुव्यवस्था चोख राखण्याची जबाबदारी कल्याण पोलिसांवर आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी ३३ तडीपार प्रस्तावामध्ये ४२ जणांना ठाणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहेत.

First Published on: April 16, 2019 6:03 PM
Exit mobile version