‘त्या’ प्रकाराला राजकीय रंग देऊ नका; कुस्तीसम्राट काझा यांनी ठणकावले

‘त्या’ प्रकाराला राजकीय रंग देऊ नका; कुस्तीसम्राट काझा यांनी ठणकावले

सोलापूरः महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत घडलेल्या प्रकाराला जातीय रंग देऊ नका. पैलवान सिकंदर शेख हा मुस्लिम असल्यामुळे हा प्रकार घडलेला नाही, असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र उपांत्य फेरीत माती विभागात पैलवान सिकंदर शेख व पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. या लढतीत पैलवान शेखवर अन्याय झाल्याची चर्चा होती. सोशल मिडियावर याबाबत मते मांडण्यात आली. काहींनी या प्रकाराला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पैलवान शेख हा मुस्लिम असल्यामुळेच हा प्रकार झाला, असा आरोप काहींनी केला. या आरोपाला कुस्तीसम्राट काझी यांनी उत्तर दिले आहे. उपांत्य फेरीतील प्रकार पैलवान शेख मुस्लिम असल्यामुळे झालेला नाही. हा प्रकार गडबडीत झाला आहे, असे कुस्तीसम्राट काझी यांनी स्पष्ट केले व या आरोपांवर पडदा पाडला.

पैलवान गायकवाड व शेखमध्ये पारदर्शक लढत झाली. एका लढतीत ज्युरींनी गुण देताना गडबड केली. चारही बाजू तपासूनच ज्युरीने निर्णय द्यायला हवा होता. ज्युरीने घाईत व गडबडीत हा निर्णय दिला असावा. शेखचा प्रशिक्षक त्यावेळी आक्षेप नोंदवत होता. तेव्हा त्याला ओढत नेल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे या घटनेला गालबोट लागले. मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांशी याबाबत बोललो. त्यांनीही हा निर्णय देताना ज्युरींनी चूक केल्याचे मान्य केले. मात्र शेख मुस्लिम असल्याने हा प्रकार घडलेला नाही. ज्युरींनी अनावधानाने किंवा गडबडीत चूक केली असावी, असे मत कुस्तीसम्राट काझी यांनी व्यक्त केले.

कुस्तीसम्राट काझी पुढे म्हणाले, पैलवान हिच आमची जात असते. बजरंगबलीचे नाव घेऊनच आम्ही पण आखाड्यात उतरत असतो.  मी मुसलमान आहे. पण माझ्या तालमीचे नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल आहे. कारण आमच्या इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. मला तालीम बांधून देणारी व्यक्ती मारवाडी समाजाची आहे. मी गेली २० वर्षे या क्षेत्रात आहे. अस्लम काझी असो किंवा सिंकदर शेख याच्यावर केवळ कोणताही एक धर्म प्रेम करत नाही. सर्व जाती धर्माचे लोक आमच्यावर प्रेम करतात. महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत घडलेल्या प्रकारावरून राजकारण सुरु आहे. याला विनाकारण जातीय रंग दिला जातोय, असे मला वाटते आहे, असे कुस्तीसम्राट काझी यांनी सागितले.

कुस्तीगीर परिषदेच्या राजकारणाशी पैलवानांना काही देणेघेणे नाही. निवृत्त झालेल्या पैलवानांनी कुस्तीसाठी झटले पाहिजे, कुस्तीच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने कुस्तीगीर परिषदेला बरखास्त केले. मात्र हा अधिकार कुस्तीगीर महासंघाला नाही. कुस्तीगीर परिषद ही धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली संस्था आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघ जास्तीत जास्त आपली सलग्नता काढून घेऊ शकते, मात्र बरखास्त करु शकत नाही. त्यामुळे हा वाद न्यायलयात गेला. या राजकारणामुळे कुठल्याही पैलवानाचे नुकसान होऊ नये अशी आमची भावना असल्याचे मत कुस्तीसम्राट काझी यांनी व्यक्त केले.

संग्राम कांबळे हे माझे चांगले मित्र आहेत. जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यानंतर संग्राम कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे चुकीचे आहे. पैलवान काचेच्या भांड्यासारखा असतो. एखाद्याच्या चुकीमुळे त्याचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते.  तळमळीने विचारपूस केल्यास त्याला धमकी म्हणता येऊ शकत नाही, असेही कुस्तीसम्राट काझी यांनी स्पष्ट केले.

First Published on: January 21, 2023 3:01 PM
Exit mobile version