लेखिका डॉ. प्रतिभा भिडे यांना ‘हिरकणी पुरस्कार’ प्रदान!

लेखिका डॉ. प्रतिभा भिडे यांना ‘हिरकणी पुरस्कार’ प्रदान!

लेखिका डॉ. प्रतिभा भिडे

गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या लेखिका-कवयित्री डॉ. प्रतिभा भिडे यांना भारतीय कला संस्कृती साहित्य संगीत निसर्ग पर्यटन महासंमेलनात अतिशय मानाचा समजला जाणारा “हिरकणी पुरस्कार – २०१” देऊन नुकतेच गौरविण्यात आले. अमरावती येथील टाऊन हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी भारतातील कर्तृत्ववान व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रतिभा भिडे या प्रतिभावंत साहित्यिका म्हणून ओळखल्या जातात. ‘मावळते चाँदणे’, ‘विभ्रम’, ‘अलवार क्षण’, हे काव्यसंग्रह ‘संगीत शिवलीला’, ‘नो किड्स – नो किचन’, ही नाटके, आता मला बोलू द्या (एकांकिका), ओम्बील (ललित लेख संग्रह) इत्यादी त्यांची अनेक पुस्तके शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहेत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘विभ्रम’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात कवयित्री प्रतिभा भिडे यांच्या काव्यशैलीचे मनापासून कौतुक केले होते. विविध पुरस्कारांनी प्रतिभा भिडे यांना गौरविण्यात आलेले आहे.

राज्यमंत्र्यांच्या उपस्थिती पुरस्कार सोहळा 

हिरकणी पुरस्कारामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचा सन्मान झाल्याची भावना डॉ. प्रतिभा भिडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच माझ्या लेखनाला वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या शारदा प्रकाशनचा माझ्या यशात मोठा वाटा असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री आणि अमरावती विभागाचे पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे. भारतीय सेनेचे कर्नल अभय पटवर्धन, कर्नल परमशीव सेजव, मध्य प्रदेशचे डॉ. नीलय जैन, गुजरातच्या योग गुरु माता राजश्री देसाई आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

शहिदांच्या कुटुंबियांना केली मदत 

या कार्यक्रमात स्वर्गीय रणजीत सिंह सचदेव स्मृतिप्रीत्यर्थ विशेष कामगिरी केलेल्या चार महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार अमरावती येथील ज्येष्ठ समाजसेविका, साहित्यिका कवयित्री अलका सप्रे, गुजरातच्या योग गुरु राजश्री देसाई, रंजना लुंगसे धुळे तसेच ठाण्याच्या प्रतिभाताई जयंत भिडे या चार महिलांना मंत्री महोदय प्रवीण भाऊ पोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आरती सचदेव यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारताच्या पंतप्रधानांना अकरा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्याप्रित्यर्थ अनन्य साधारण कृतज्ञतेचा राष्ट्रीय उपक्रम या सोहळ्यात पार पडला. तर या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय जलतरणपटू दर्शना लक्ष्मण, मुंबईतील माननिय आरतीताई सचदेव मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीत गायनाला उजाळा देणारी कला कार्यक्रमात सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन, क्रांती महाजन, संदीप बाजड, उमेश लोटे, अलका सप्रे अशा अनेक प्रभृतींनी परिश्रम घेतले म्हणून हा सोहळा दिमाखात पार पडला.

First Published on: February 16, 2019 5:00 PM
Exit mobile version