मातोश्रीच्या नाराजीमुळे यशवंत जाधवांची हॅट्रिक हुकणार, तरुणांना संधी!

मातोश्रीच्या नाराजीमुळे यशवंत जाधवांची हॅट्रिक हुकणार, तरुणांना संधी!

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हॅट्ट्रिक करण्याचे वेध लागलेल्या ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर मातोश्रीची खप्पामर्जी झाल्यामुळे आणि स्थायी समितीतील त्यांच्या मनमानीमुळे त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी समजल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर सलग दोन वर्षे बसण्याची संधी माझगावचे ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांना मिळाली. महापालिकेतील सेनेच्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवकांची स्पर्धा मोडीत काढण्याच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून पक्षातील अनेक मौनी नगरसेवक स्थायी समितीत सदस्य म्हणून जाधव यांच्याकडून निवडण्यात आले. स्टँडिंग मधील ‘अंडरस्टँडिंग’ मुळे इतर पक्षांतील नगरसेवकही विशेष विरोध करत नसल्याने यशवंत जाधव यांची पालिकेत एकाधिकारशाही सुरू झाली.

मुंबई महापौर निवडीच्या वेळी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या वेळी यशवंत जाधव यांचे नावही चर्चेत होते; पण योग्य उमेदवार निवड प्रक्रियेवेळी जाधव यांनी १७ नोव्हेंबरच्या रात्री शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात केलेले वर्तन आक्षेपार्ह होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेही या घटनेनंतर जाधव यांच्यावर नाराज झाले आणि दुसर्‍या दिवशी शेवटच्या क्षणाला मातोश्री कडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

माजी आमदार विशाखा राऊत या सभागृह नेतेपदी असताना त्यांना डावलून अनेक निर्णय महापालिकेत घेतले जातात. जाधव-राऊत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. ३० मार्च रोजी स्थायी समितीची शेवटची बैठक पार पडली. या बैठकीवर भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर मात्र स्थायी समितीची बैठक झालेली नाही. अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्थायी समितीच्या बैठका आयोजित करू नयेत, असे आदेशही पालिकेत धाडण्यात आले. त्यानंतर मात्र युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी स्थायी समितीच्या दालनातून आपला ‘लक्षवेधी’ वावर सुरू केला. कोविडच्या संदर्भात करण्यात आलेल्या कामातही सारी सुत्रे महापौर किशोरी पेडणेकर आणि युवासेनेच्या पदाधिकार्‍यांकडूनच हलविण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेतील १७ प्रभाग समिती, स्थायी, सुधार, बेस्ट आणि शिक्षण या चार वैधानिक समित्या आणि पाच विशेष समितीच्या निवडणुका घेण्यासाठी पालिकेकडून नगरविकास मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या निवडणुका लवकरच होणार असून येणार्‍या महत्त्वपूर्ण वर्षात स्थायी समितीत तरुण, संयमी आणि मातोश्रीच्या आज्ञाधारक नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणार्‍या वर्षी अध्यक्षपदाची माळ ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत रहाटे किंवा आशिष चेंबूरकर यांच्या गळ्यात पडू शकते. मुंबई महानगरपालिकेत आतापर्यंत कधीही अध्यक्षपद महिलेला मिळालेले नाही.त्यामुळे माजी महापौर श्रध्दा जाधव, ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यादेखील बाजी मारु शकतात. सेनेच्या यंग ब्रिगेडमधून सदस्यत्वासाठी शीतल म्हात्रे, राजू पेडणेकर, अमेय घोले, सचिन पडवळ, अशोक (बाळा) नर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

First Published on: July 15, 2020 6:56 AM
Exit mobile version