येवला : खुल्या मैदानांसह, इमारतींच्या टेरेसवर पतंगोत्सवाची धमाल

येवला : खुल्या मैदानांसह, इमारतींच्या टेरेसवर पतंगोत्सवाची धमाल

येवला : मकरसंक्रांतीपासून सुरू होणार्‍या तीन दिवसीय पतंगोत्सवाला शहरात दणक्यात सुुरुवात झाली. या पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लहानग्यांपासून तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकदेखील सहभागी झाले होते. पतंगप्रेमींचा आवाज आणि जल्लोषाने संपूर्ण शहरात उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे अनुकूल वातावरणामुळे रंगबिरंगी पतंगांनी आकाश व्यापले होते.

पतंग बनवण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचे भाव 15 ते 20 टक्क्यांनी वाढले असले तरी पतंगांची मागणी वाढत आहे. शहरातून विविध ठिकाणी पतंग पाठवले जातात. कागद, कामटीची किंमतदेखील वाढली आहे. तसेच, यंदा मुख्यमंत्र्यांचे चित्र असलेल्या पतंगांनादेखील मागणी असल्याचे व्यावसायिक प्रवीण भावसार यांनी सांगितले. आसारीसाठी लागणारे लकडी दुसर्‍या ठिकाणाहून आणावी लागते व त्यातून खर्च वाढतो. मात्र, आवडीला मोल नसते या उक्तीनुसार पतंगप्रेमींनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

येवलेकर पारंपरिक पद्धतीने संक्रांत साजरी करतात. भोगी, संक्रांत आणि करदीन असे तीन दिवस डिजे, सायंकाळी कंदील पतंग आणि आतषबाजीदेखील पाहायला मिळते. पतंग उत्सव आणि येवला याचे अतूट नाते अनेक वर्षांपासून दिसते आहे. या उत्सवासाठी विविध राज्यातून अनेक नागरिक हा पतंगोउत्सव पाहण्यासाठी आवर्जून येतात. अगदी परदेशी नागरिकदेखील येतात. याची काही मजा औरच असते.

अनेक पाहुणे राज्यभरातून हा क्षण पाहण्यासाठी येतात. युवक गच्चीवरच वडे, भत्ता, केळी खातात व पतंगबाजीचा आनंद लुटतात. अर्दीचा, पाऊणचा, एकचा, सव्वाचा अशा वेगवेगळ्या आकारात पतंग मिळतात. आसारी बनविणे हीदेखील एक कलाच असते. परंतु, एक नवीन पर्याय म्हणून आसरीला नवीन प्रकारचे कुशन लावण्याचे कामदेखील सुरू असल्याचे इंडिया कुशन दुकानाचे संचालक हारूनभाई शेख कुशनवाले यांनी सांगितले. पतंगबाजीमुळे शहरात मात्र जल्लोषाचे वातावरण आहे.

राजकीय नेत्यांची काटाकाटी

पतंगोत्सवासाठी प्रसिद्ध येवला शहरात राजकीय नेते व पदाधिकारीदेखील रविवारी (दि.१५) आवर्जून उपस्थित होते. त्यांनी मांजा हाती घेत पतंगबाजीचा आनंद लुटला. दरम्यान, मकरसंक्रांतीनिमित्त केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पहिल्याच दिवशी भाजपचे कार्यकर्ते समीर समदडीया यांच्या गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद घेतला. नायलॉन मांज्या वापरू नका, जागरूक नागरिक म्हणून आपण जबाबदारी घेतली पाहिजे, असा संदेशही समदडिया यांनी दिला. रविवारी सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व डॉ. राहुल शेवाळे यांनी हजेरी लावत प्रितम पटनी यांच्या गच्चीवर पतंग उडवून आनंद घेतला. दुपारच्या वेळेत राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा नेते समीर भुजबळ यांनी पतंगोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी पदवीधर मतदारसंघाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आता कुठे पतंग उडाली आहे. तुम्हाला समजेल की कोणाची पतंग कापली जाईल, असे मार्मिक उत्तरही दिले.

First Published on: January 16, 2023 11:59 AM
Exit mobile version