योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; राजभवनातील भूमिगत संग्रहालयाला भेट

योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; राजभवनातील भूमिगत संग्रहालयाला भेट

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहेत. बुधवारी त्यांचे राजभवन येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज, गुरुवारी सकाळी राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.

राज्यपालांच्या विनंतीवरून योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

राज्यपालांच्या भेटीनंतर, योगी आदित्यनाथ ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये विविध बँकांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तर, दुपारी 12 ते 2 या वेळेत जीआयएस रोड शोमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. या रोड शोच्या आधी योगी आदित्यनाथ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइज लि. चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची भेट घेणार आहेत. तर, रोड शोनंतर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स अँड सेझचे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीईओ अध्यक्ष मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी अध्यक्ष फिरोजशा गोदरेज यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान या उद्योपतींना यूपीमध्ये व्यवसाय करण्याच्या सुलभतेबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी योगी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची भेट घेणार आहेत.

First Published on: January 5, 2023 11:12 AM
Exit mobile version