कोकण कन्येची उंच भरारी; जागतिक परिषदेत दिले व्याख्यान

कोकण कन्येची उंच भरारी; जागतिक परिषदेत दिले व्याख्यान

जागतिक आरोग्य संघटना

प्राथमिक आरोग्य सेवेच्या जागतिक परिषदेत पूर्वाप्रभा पाटील ही तरुणी सहभागी झाली असून हा मान मिळवणारी पूर्वाप्रभा रत्नागिरीची सुकन्या आहे. गेल्या महिन्यात २५ आणि २६ ऑक्टोबरला झालेल्या प्राथमिक आरोग्य सेवेच्या जागतिक परिषदेत रत्नागिरीतील पूर्वाप्रभाने प्रवक्ता म्हणून सहभाग घेतला. ही परिषद जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि कझाकस्तान सरकार यांनी एकत्रितरीत्या आयोजित केली होती. जगभरातून आमंत्रित केलेल्या केवळ ११ तरुण वक्त्यांपैकी एक आणि भारतातील एकमेव युवती वक्ता म्हणून तिची निवड झाली. २५ ऑक्टोबर २०१८ ला प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रावर लोकांचे सशक्तीकरण या विषयावर पूर्वाप्रभाला बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या सत्रात मंत्री पातळीवरील सदस्य सहभागी होते.

४० वर्षानंतर आरोग्य सेवेचे घोषणापत्र

अल्मा अट्टाच्या परिषदेचा ४० व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आणि २१ व्या शतकात प्राथमिक आरोग्य सेवेला एक साहसी दृष्टिकोन देण्यासाठी या परिषदेमध्ये मंत्री, आंतरराष्ट्रीय संस्था, नागरी समाज, शैक्षणिक कार्यकर्ते आणि इतर सामाजिक घटक एकत्र आले होते. जागतिक स्तरावर आरोग्य सेवेचा प्रसार आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याची शिफारस करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अल्मा अट्टाच्या परिषदेने १९७८ मध्ये जागतिक पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवेचे घोषणापत्र मांडले होते. त्यामध्ये ४० वर्षांनंतर सुधारणा करून अस्थानाचे नवीन सुधारित घोषणापत्र स्वीकारले गेले. ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पूर्वाप्रभाने सांगितले.

First Published on: November 27, 2018 8:07 PM
Exit mobile version