डिग्री विकणे आहे; हवी असल्यास संपर्क साधा!

डिग्री विकणे आहे; हवी असल्यास संपर्क साधा!

त्याने डिग्रीच काढली विकायला!

आयुष्यभर आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मुलाला शिकवायचं आणि मुलाच्या नोकरीच्या आशेवर स्वत:च्या आरामाची स्वप्न रंगवायची हे सगळीकडेच दिसणारं चित्र आहे. मात्र, नागपूरच्या एका तरुणासाठी ही अशक्य अशी गोष्ट वाटू लागली आहे. त्यामुळेच त्रस्त झालेल्या या तरुणाने थेट आपल्या शिक्षणाच्या पदव्याच विकायला काढल्या आहेत. जगन्नाथ गायकांबळे असं या तरुणाचं नाव असून डिग्री विकण्यासंदर्भात त्यानं सोशल मीडियावर जाहीर पोस्टच टाकली आहे. ‘बेरोजगारीला कंटाळून BA, MA, B.ed या नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्या विकणे आहे’, असं जगन्नाथने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

नोकरी नाही, उद्योगाला कर्जही नाही

जगन्नाथचे आई-वडील शेती करतात. आयुष्यभर शेतीतून पैसा काढून त्यांनी जगन्नाथला शिकवलं. जगन्नाथनं गोंडवाना आणि नागपूर विद्यापीठातून बीए, एमए आणि नंतर बीएड अशा पदव्यांचं शिक्षण देखील पूर्ण केलं. आता नोकरी लागेल आणि आई-वडिलांना आराम मिळेल अशी आशा जगन्नाथला होती. मात्र, नोकरीनं त्याला वारंवार हुलकावणी दिली. कधी डोनेशनमुळे तर कधी दुसऱ्या उमेदवारांच्या ओळखीमुळे जगन्नाथची नोकरी हुकली. नोकरी नाही तर व्यवसाय तरी सुरू करावा म्हणून जगन्नाथने ‘स्टॅण्डअप इंडिया’ योजनेच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी कर्जाचा अर्ज केला. मात्र, तिथेही हमी मिळाली नाही म्हणून त्याला बँकेने कर्ज नाकारलं.

पदव्यांचा उपयोग काय?

इतकं शिक्षण घेतल्यानंतर देखील आता जगन्नाथला एका खासगी कंपनीत वॉचमनची नोकरी करावी लागत आहे. त्यामुळे जर मिळवलेल्या पदव्यांचा काहीच उपयोग होणार नसेल, तर या पदव्यांचं करायचं काय? असा प्रश्न जगन्नाथला पडला. त्यातूनच त्याने त्याच्या पदव्याच विकायला काढल्या आहेत. ‘शिक्षक व्हायचं होतं. त्यासाठी लागणाऱ्या सर्व पदव्या देखील मी मिळवल्या. पण तरी देखील नोकरी मिळत नसेल तर या पदव्यांचा काय उपयोग?’ असा प्रश्न जगन्नाथला पडला आहे. याचं उत्तर कदाचित आज तरी या व्यवस्थेकडे नसावं!

First Published on: December 30, 2019 10:21 AM
Exit mobile version