युवकांनी सुरु केली ‘बिबट सफारी’; जुन्नर तालुक्यातील प्रयोग

युवकांनी सुरु केली ‘बिबट सफारी’; जुन्नर तालुक्यातील प्रयोग

आळेफाटा : जुन्नर तालुक्यात विशेषतः ओतूर आणि परिसरात बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काळोखात बिबटयांचा खुले आम वावर दिसून येत असल्याने बिबटे ओतूर परिसरातील वाड्या वस्त्यांना जाणार्‍या रस्त्यांवर रात्रीच्या अंधारात बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. हे ओतूरमधील काही युवकांच्या लक्षात आल्यामुळे रात्री ११ वाजेनंतर बहुतांश युवक बिबट्याच्या हालचाली मोबाईलद्वारे व्हिडिओतून टिपण्यासाठी व बिबट्याला पहाण्यासाठी बंदिस्त चारचाकी गाडीतून गटा गटाने राणावनाकडे जाणार्‍या रस्त्याने प्रवास करून बिबट्याचे दर्शन घेत आहेत.

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत बिबट सफारी प्रकल्प आंबेगव्हान येथेच होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या बिबट सफारी प्रकल्प कामाला ‘देर ना हो जाये’ असेच दररोज रात्री बिबट्या बघायला जाणार्‍या युवकांना तर सांगायचे नाही ना? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान ओतूर,रोहोकडी, आंबेगव्हान,लागाचा घाट रस्ता,गाढवेपट, पानसरेपट,पाथरटवाडी, अहीनवेवाडी, शेटेवाडी, उदापूर, मांदारणे,डिंगोरे,आमले शिवार, पानसरेवाडी, घुलेपट, धोलवड, हिवरे, ओझर या सर्व मार्गावर रात्री चार चाकी गाडीतून फेरफटका मारला असता दररोज हमखास बिबट्याचे सुलभ दर्शन होत असल्याचे अनुभव ओतूरचे युवक सांगत आहेत.

बिबट्या सफारी प्रकल्पाचे काम लवकर सुरू करा

बिबट्याबाबत जुन्नर तालुक्यातील वृत्त ऐकुन राज्यभरातील लोक प्रश्न विचारत असतातच. मात्र आता चक्क सफारी केंद्र सुरू होण्या अगोदरच युवक वर्ग बिबट्याच्याच भेटीला स्वतःहून जात असल्यामुळे रात्री बेरात्री ओतूरच्या परिसरात चारचाकी गाड्यांची वर्दळ वाढली आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर पासून अवघ्या पाच किमी अंतर असलेल्या आंबेगव्हान या ठिकाणी बिबट सफारीची जागा निश्चिती झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटर द्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

जुन्नर तालुक्यातील नागरिक व पर्यटकांमध्ये हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. एकंदरीत हा प्रकल्प आंबेगव्हान या ठिकाणी निश्चित झाल्याने जुन्नर तालुक्यातील अणे माळशेज पट्यातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, पाचघर, उदापुर, मढ, डिंगोरे, डुंबरवाडी, खामुंडी व उर्वरित ५० आजूबाजूच्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आफ्रिकन सफारीच्या धर्तीवर राज्यात बिबट्या सफारी नैसर्गिक अधिवास असलेल्या बिबट प्रवण क्षेत्रात आंबेगव्हान येथे सुरू करण्याची योजना माजी आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्यापाठपुराव्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चिली जात आहे.

५० हेक्टर जागेवर होणार सफारी

आंबेगव्हान या ठिकाणी १५० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. त्यापैकी ५० हेक्टर जागेची निवड करून तेथे ही सफारी सुरू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यभरातून जुन्नर तालुक्यात पर्यटक येण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. जुन्नर तालुक्यात येणार्‍या पर्यटकांचा ओघ अधिक असल्याने तसेच नैसर्गिक अधिवास,मुबलक पाणी शांत वातावरण, दाट झाडी, मुबलक जागा, ओढे, रस्ते यामुळे ‘बिबट्या सफारी’साठी आंबेगव्हान येथील जागेची निश्चिती करण्यात आली आहे. बिबट् मानव संघर्ष व इतर समस्या कमी होण्यासोबत पर्यटनाला चालना मिळण्याकामी बिबट सफारी प्रकल्प कामाला लवकरात लवकर चालना मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे.

First Published on: November 1, 2022 12:49 PM
Exit mobile version