डम्पिंगवरील मुलांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना

डम्पिंगवरील मुलांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना

डम्पिंगवरील मुलांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना

घरी अठरा विश्वे दारिद्र्य, मुख्य प्रवाहापासून तुटलेले नाते आणि समाजाकडून मिळणारी अवहेलना हे कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांचे विदारक वास्तव. शिक्षणाद्वारेच ही परिस्थिती उलथवून केलेली ध्येयपूर्ती हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना ठरेल, असा विश्वास या मुलांनी व्यक्त केला आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने या मुलांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

शिक्षणामार्फत परिवर्तनाचा प्रयत्न

कचरा हाच भूतकाळ आणि वर्तमानकाळ असला तरी भविष्यकाळ मात्र दैदीप्यमान घडवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा लढा सुरू आहे. कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर राहणाऱ्या आणि स्वतः कष्ट करीत शिकणाऱ्या तरुणांनी बाबासाहेबांचा विचारवारसा पुढे नेण्याचा दृढ निश्चय केला आहे. ज्यांच्या झोपडीत पूर्वीच्या पिढ्यांचा साधे पाटी-पुस्तकालाही स्पर्श झाला नाही, त्या वस्तीतील पुढची पिढी मात्र शिक्षण आणि चांगल्या भविष्याच्या वाटेवर आपल्या पाऊलखुणा उमटवत आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील साठेनगर वस्तीत राहणार रवी चक्रधर घुले. हा इथला पहिला पदवीधर तरुण जो सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करत आहे. तर इतर विद्यार्थी ज्युनिअर कॉलेज, डिग्री कॉलेज अशा महत्वाच्या टप्प्यांवर पोहचले आहेत. तसेच मुक्त शिक्षणाच्या माध्यमातून काही कष्टकरी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन पुढची वाटचाल करीत आहेत. हे करतानाच अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, उद्योजकता विकास, स्वयंप्रेरित उद्योग, कलाकृती, वाचन-लेखन या उपक्रमांना प्रत्यक्षात आणत आहेत. एवढेच नाही तर परिवर्तन, समता, समाजाप्रती आणि त्यातील अभावग्रस्तांसाठी बांधिलकी सामाजिक भान जपताना दिसत आहेत. त्यासाठी ‘अनुबंध’ ही संस्था त्यांच्या पाठीशी अत्यंत भक्कम आणि खंबीरपणे उभी राहिली आहे. निदान पुढच्या पिढीचे जीवन तरी अर्थपूर्ण आणि मूल्याधिष्ठित असावे, एवढीच या संस्थेची काय ती तळमळ. मात्र ‘शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण समाज परिवर्तन करू शकतो’ या बाबासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून ही तरुण पिढी आज यशाच्या एक एक पायऱ्या चढत आहे. यापेक्षा बाबासाहेबांना अपेक्षित मानवंदना कोणती असू शकते.

First Published on: April 14, 2019 9:10 PM
Exit mobile version