नियोजनशून्य कारभाराचा माणगावला फटका

नियोजनशून्य कारभाराचा माणगावला फटका

नगर पंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील काही भागांना बसत असल्याने संतापलेली जनता आता याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहे.माणगाव-दिघी पोर्ट रस्त्याचे काम सुरू असताना मोर्बा मार्गावरील गटारे काढणे आवश्यक होती. पण ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात पाणी अनेकांच्या घरात जायला लागल्यानंतर गटारे खोदण्यास सुरूवात केली. ती गटारे सध्या अपूर्ण अवस्थेत आहेत. या गटारामध्ये मोजक्या ठिकाणी सिमेंटचे पाइप टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाईप न टाकल्यामुळे पावसाचे या गटारातील पाणी खांदाड, सिद्धीनगर, मोर्बा रोडवरील राहिवाशांच्या घरे, तसेच दुकानांतून शिरत आहे. या पाण्यामुळे साथीच्या रोगांची भीती रहिवाशांना सतावत आहे.

काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे, भराव करण्यात आले असून, पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे हे पाणी खड्ड्यांमध्ये साचून त्याला दुर्गंधी येत असते. शहरातील गटाराचे पाणी कोणत्या ठिकाणी सोडायचे याचे नियोजन नसल्याने गटारे तुडुंब झाली की हे पाणी रहदारीच्या रस्त्यांवर येत असते. याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. मोर्बा मार्गावरील गटाराची पाइपलाइन उघडीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या ठेकेदारासह कामगार दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे या समस्येबाबत तक्रार तरी कोणाकडे करायची, असा प्रश्न रहिवाशांना भेडसावत आहे.

याबाबत सिद्धीनगर व खांदाड रहिवासी नगर पंचायतीवर लवकरच मोर्चा नेण्याच्या तयारीत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.

First Published on: August 9, 2019 1:01 AM
Exit mobile version