मूलं नाही हे आम्ही स्विकारलंय, तुम्ही केव्हा स्विकारणार ?

मूलं नाही हे आम्ही स्विकारलंय, तुम्ही केव्हा स्विकारणार ?

आमच्या लग्नाला सात वर्ष उलटून गेलेत. पण आम्हाला मूलबाळं झालं नाही. अनेक डॉक्टर झाले. आम्ही दोघांनी अनेक तपासण्या केल्या. पण दोष कोणातच नाहीये. मग असं असतानाही माझ्या घरी पाळणा का हलला नाही हे आमच्यासाठी एक मोठ कोड आहे. सुदैवाने आमच्या घरातील सगळेजण सुशिक्षित आहेत. त्यामुळे मूल नाही म्हणून कोणीही मला कधी टोचून , घालून पाडून बोललं नाही आणि कधी यावर कोणी आम्हाला कधी काही विचारतही नाही. दिरांची दोन मुलं आहेत. त्यांनाच आम्ही आमच्या मुलांप्रमाणे प्रेम करतो. त्यांनाही आमचाच लळा आहे. त्यामुळे आम्हांलाही मूल नसल्याचं कधी जाणवत नाही. एवढं समजूतदार माझं कुटुंब आहे हे माझं सुदैवंच आहे.

पण काही दिवसांपूर्वी मला माझी जुनी मैत्रीण भेटली. बऱ्याच वर्षांनी भेट झाल्याने आम्ही कॉफी घेत गप्पा मारुया असं ठरवलं आणि कॉफी शॉपमध्ये गेलो. गप्पांदरम्यान पूजाला दोन मुलं असल्याचं कळलं..ऐकून मला खूप आनंद झाला..पण मला मुलबाळ नाही हे कळाल्यावर तिचा चेहरा मात्र पडला. हे बघून खरंतर मलाच कळालं नाही काय करावं.. कारण मला आता या गोष्टींचं काही वाटनासे झालंय. आपल्याकडे जे आहे ते एन्जॉय करायचं आणि जे नाही त्यासाठी कुढतं नाही बसायचं असं आम्ही दोघांनी आधीच ठरवलंय. आम्ही छान पैकी एकेमेकांना वेळ देतोय. एकमेकांवर पुन्हा एकदा जीवापाड प्रेम करतोय. मित्र मैत्रिणींबरोबर आऊटींग, पार्ट्या एन्जॉय करतोय. पण पूजा सारखी माणसं भेटली की नकोस होतं. आम्हाला मूलबाळ नाही याचं आमच्या पेक्षा दुसऱ्यांनाच जास्त दुःख आहे. याची कमाल वाटते. जर आम्ही आमच्या आयुष्यात मूल नसल्याने रडत न बसता पुढे जातोय तर पूजासारख्या व्यक्तींना काय गरज आमच्या आयुष्यात नसलेल्या गोष्टींची आम्हांला पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्याची. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात जरा डोकावून बघा. पण तसं होत नाही एखाद्याच्या आयुष्याचा प्रॉब्लेम हा दुसऱ्यांसाठी फक्त चर्चा चघळण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी असतो. याचा खूप राग येतो. आज मूल नसलेली अनेक जोडपी आहेत. ज्यांनी ते कधीच आई बाबा होऊ शकतं नाहीत हे स्विकारलं आहे. काहींना मूल दत्तक घेत ती कमतरता पूर्ण केली तर काही आमच्यासारखीही आहेत ना. ज्यांना त्याचीही गरज वाटत नाही. मूल नाही हे आम्ही स्विकारलंय आता तुम्ही केव्हा हे स्विकारणार हा माझा सगळ्यांसाठी प्रश्न आहे.

 

First Published on: May 9, 2023 4:15 PM
Exit mobile version