आरटीई प्रवेशासाठी चार दिवसांत 60 हजार अर्ज

आरटीई प्रवेशासाठी चार दिवसांत 60 हजार अर्ज

RTE

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पहिलीच्या प्रवेशासाठी 25 टक्के आरक्षण दिले जाते. दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखापर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 16 टक्के मराठा व 10 टक्के सवर्ण आरक्षण याबाबत स्पष्ट निर्देश न आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली होती. मात्र 5 मार्चपासून आरटीईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत राज्यातून 60 हजार अर्ज भरण्यात आले. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक व मुंबईमध्ये अर्ज भरण्याचे प्रमाण अधिक आहे.

समाजातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावे यासाठी आरटीईच्या माध्यमातून त्यांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला जानेवारीमध्ये सुरुवात होते. परंतु यावर्षी आरक्षण व उत्पन्न मर्यादेत केलेल्या वाढीबाबत केंद्र सरकारकडून स्पष्ट निर्देश आले नव्हते. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पालकांनी 5 मार्चला ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होताच तातडीने अर्ज भरण्यास सुरुवात केली. पालकांनी प्रवेश प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद देत अवघ्या चार दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातून तब्बल 60 हजार अर्ज भरण्यात आले. यामध्ये मोबाईल अ‍ॅपद्वारेही अर्ज भरण्यात आले.

आरटीई अंतर्गत राज्यातील नऊ हजार 194 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 803 जागा आहेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जांमध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक 13 हजार 239 अर्ज भरण्यात आले आहेत. त्याखालोखाल नागपूरमध्ये 9604, ठाण्यात 4045, नाशिकमध्ये 3898 व मुंबईमध्ये 3203 इतके अर्ज भरण्यात आले आहेत. सर्वात कमी अर्ज सिंधुदूर्ग 27, नंदुरबार 52, रत्नागिरी 108 या जिल्ह्यांमधून भरण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 मार्चपर्यंत आहे.

सर्वाधिक भरलेले अर्ज
पुणे 13239
नागपूर 9604
ठाणे 4045
नाशिक 3898
मुंबई 3203

First Published on: March 10, 2019 4:50 AM
Exit mobile version