रिपाइंला विधानसभेत हव्यात १० जागा

रिपाइंला विधानसभेत हव्यात १० जागा

RPI

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपावरुन सध्या चर्चेला उधाण आले आहे. त्यात आता रिपब्लिकन पक्षाने(आठवले गट) (रिपाइं) नव्या जागावाटपासाठी मागणी केल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप- शिवसेना महायुतीसोबत निवडणूक लढणार आहे.राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी 18 जागा महायुतीतील मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यातील 10 जागा रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहेत. या 10 जागांवर रिपब्लिकन पक्ष तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असून या जागांवर रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत जाहीर केले.

मुंबईत काही पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेना महायुतीसोबत राहणार आहे.त्यात होणार्‍या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला मिळणार्‍या जागांवर रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत, तर स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी गुरुवारी केली. निवडणूक आयोगाकडे असलेल्या राखीव स्वतंत्र चिन्हांपैकी एका चिन्हाची रिपब्लिकन पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत बांद्रा येथील संविधान बंगल्यावर दिली. तर त्यानंतर मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आगामी विधानसभेसाठी आपण सज्ज असल्याचे विरोधकांसह मित्रपक्षांना देखील दाखवून दिले आहे.

First Published on: September 6, 2019 1:05 AM
Exit mobile version