दीड लाख वीजग्राहक मीटरच्या प्रतिक्षेत, नागरिकांमध्ये नाराजी

दीड लाख वीजग्राहक मीटरच्या प्रतिक्षेत, नागरिकांमध्ये नाराजी

इलेक्ट्रिक मीटर

24 तासात वीजजोडणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महावितरणने अनेक महिने ग्राहकांना वीजजोडणीसाठी प्रतिक्षेत ठेवले आहे. जवळपास दीड लाख ग्राहकांना अनेक महिन्यांपासून विजेचे मीटर दिलेले नाही. राज्यातील वीज ग्राहकांनी आगाऊ पैसे मोजूनही मीटर न मिळाल्याने महावितरण कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नवीन मीटर जोडणी पुरवण्याच्या कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे नुकत्याच झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यवस्थापकीय संचालकांनी विविध परिमंडळातील अधिकारी वर्गाला खडे बोल सुनावले आहेत.

महावितरणकडे नवीन वीज मीटरसाठी पैसे मोजलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ४२ हजार आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक अशा तिन्ही प्रकारच्या ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणने सप्टेंबर महिन्यात २३ लाख वीज मीटर खरेदी केले होते. त्यापैकी २० लाख मीटरची खरेदी ही सिंगल फेज घरगुती ग्राहकांसाठी तर अडीच लाख थ्री फेज ग्राहकांसाठी करण्यात आली होती. पण सात ते आठ महिने उलटूनही पैसे भरणाऱ्या ग्राहकांना नवीन मीटरजोडणी देण्यात आलेले नाहीत. नव्याने अर्ज करणाऱ्यांची त्यात रोज भर पडत असते हे वेगळे. महावितरणने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ११ लाख १६ हजार ६७१ वीजजोडण्या दिल्या आहेत. तसेच १० लाख ९८ हजार नादुरूस्त वीज मीटर बदलून देण्यात आले आहे.

दलालांचा सुळसुळाट

वीज मीटर जोडणीसाठी महावितरणने ज्या भागात विजेची पायाभूत यंत्रणा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी २४ तासांत विजेची जोडणी देण्याचा प्रयोग राबवला आहे; पण वीजजोडणी देण्यासाठी दलालांच्या सुळसुळाटामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना पैसे भरूनही वीजजोडणी मिळालेली नाही, अशी स्थिती आहे.

First Published on: May 18, 2018 7:47 AM
Exit mobile version