२०२४ पर्यंत मेट्रोचे १ कोटी प्रवासी

२०२४ पर्यंत मेट्रोचे १ कोटी प्रवासी

एका एमएमआर क्षेत्रातून दुसर्‍या एमएमआर क्षेत्रात किमान ६० मिनिटांमध्ये प्रवास करणे शक्य झाले पाहिजे, अर्थात ३२० किमी पर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न पुढील वर्षांमध्ये होणार आहे. त्यातून २०२४ सालापर्यंत किमान १ कोटी प्रवासी मेट्रोचा वापर करतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मेट्रो सेवेचे जाळे विणले जात असल्याने येत्या काही वर्षांत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीमध्ये मोठा बदल झालेला दिसणार आहे. शनिवारी भूमिपूजन होत असलेल्या मेट्रो 10, मेट्रो 11 आणि मेट्रो 12 यामुळे मुंबई आणि उपनगरातील कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. आज देशातील मेट्रोचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात होत असून इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भूमीपूजन केलेल्या मेट्रो मार्गांमुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पासून थेट ठाणे, मीरा-भाईंदर, डोंबिवली-कल्याण, नवी मुंबईपर्यंत जाता येणार आहे. या 3 लाईनमध्ये पुढील 10 वर्षांत 40 लाख प्रवासी दररोज प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक यंत्रणांचे इंटिग्रेटेड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 320 किमीच्या या मेट्रो मार्गामुळे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी काही मिनिटेच लागणार आहेत. सन 2021-22 पर्यंत 212 किमी आणि 2023-24 पर्यंत आणखी 85 किमी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो ही ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. यामुळे जवळपास 2.5 कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.

भूमिपूजन करण्यात आलेल्या मेट्रो भवनमध्ये सर्व मेट्रो सेवांचे संचलन होणार असून आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे मेट्रो चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मेट्रो ड्रायव्हरलेसही असणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात मेट्रो कोच निर्मितीचे कंत्राट ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बीईएमएल या भारतीय कंपनीला देण्यात आले आहे. नागपूर, मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू असून हायब्रीड मेट्रोच्या माध्यमातून छोट्यातील छोट्या रस्त्यांवर मेट्रो वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नाशिक येथे हायब्रीड मेट्रो सुरू करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेट्रोच्या कोचमध्ये सायकल नेण्यासाठी एक सायकल हँगिंग स्टॅण्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रोतून सायकल नेण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. उन्नत मार्गावर सुरू होणार्‍या मेट्रोमध्ये ही सुविधा देण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिली.

प्रदूषणमुक्तीचा संकल्प करा
सध्या गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा होत आहे. पण यानिमित्ताने आपण सर्वांनी ’एक देश, एक संकल्प’ करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. गणपती विसर्जन काळात मोठ्या प्रमाणात कचरा समुद्रात टाकला जातो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यावेळी आपण सर्वांनी संकल्प करुया की, प्लॅास्टिक, कचरा समुद्रात आणि मिठी नदीत टाकणार नाही.

कसा असेल मेट्रो प्रकल्प
•गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-10 कॉरिडॉर
•9.2 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर 4 उन्नत स्थानक
•दररोज प्रवास करणार्‍यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये 21.62 लाख
•वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-11 कॅरिडॉर
•12.8 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर 10 स्थानके (8 भूमीगत, 2 उन्नत)
•दररोज प्रवास करणार्‍यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये 16.90 लाख
•कल्याण ते तळोजा मेट्रो-12 कॅरिडॉर
•20.7 किलोमीटरची ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असून त्यावर 17 स्थानके असतील
•दररोज प्रवास करणार्‍यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये 2.6 लाख

असे असेल मेट्रो भवन
•हरित भवन वैशिष्ट्यासह अद्ययावत परिचालन नियंत्रण केंद्र
•हे 32 मजली केंद्र 337 किलोमीटर 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल
•20,387 चौरस मीटर भूखंडावर हे बांधण्यात येईल
•36 महिन्यात प्रकल्प पूर्ण केला जाणार

First Published on: September 8, 2019 1:49 AM
Exit mobile version