मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता

मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता

प्रातिनिधीक फोटो- कोरोना लस

आज मुंबईच्या बीकेस कोविड केंद्रात कोरोना लसीकरण मोहीमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी कोरोनावरील लस घेतल्यानंतरही नागरिकांनी बेफिकीरपणे वागू नये. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरण्याची खबरदारी घेण्यात यावी. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणूक क्षमता असून लसीकरणासाठी ५०० पथक आणि दिवसाला ५० हजार जणांना लसीकरणाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडीत आदी उपस्थित होते.

ढिसाळ नियोजनामुळे प्रसिद्धीमाध्यमे नाराज

आजच्या कोरोना लसीकरण मोहीमेच्या कार्यक्रमाचे नियोजन अवघ्या ४०×३५ फूट जागेत करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच सरकारी, पालिका अधिकारी, डॉक्टर, नर्स, कर्मचारी, सहाय्यक, पोलीस, अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी २५०-३०० पेक्षाही जास्त लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे जागा अपुरी पडली. परिणामी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थापनाने लगेचच तेथील जागा बदलली आणि बाजूच्या जागेत ऐनवेळी कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे मीडियावाले, कॅमेरामन ज्यांनी अगोदरच कॅमेरे सेट केले होते, त्यांना जागा बदलावी लागली. दुसऱ्या जागेत तर त्याही पेक्षा जास्त हालत खराब झाली. नीटपणे नियोजन न केल्याने पुन्हा मीडियाची गर्दी झाली. पत्रकार वैतागले. कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आला आणि त्यानंतर मग थोडीफार सुत्रे हलविण्यात आली. तरीही कोरोना नियमांचे तीनतेरा वाजले. त्यामुळे मुख्यमंत्री आले असताना व ते गेल्यावरही या ढिसाळ नियोजनाची चर्चा सुरुच होती.


हेही वाचा – कोवॅक्सिनचे साईड इफेक्ट दिसले तर नुकसान भरपाई देणार, Bharat Biotech ची मोठी घोषणा


 

First Published on: January 16, 2021 6:36 PM
Exit mobile version