मुंबईतील १ हजार ६८ दवाखाने सुरु; महानगरपालिकेचा दावा

मुंबईतील १ हजार ६८ दवाखाने सुरु; महानगरपालिकेचा दावा

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी कारवाईचे इंजेक्शन भरताच संपूर्ण मुंबईतील तब्बल १ हजार ४१६ पैकी १ हजार ६८ खाजगी ‘दवाखाने व नर्सिंग होम्स’ सुरु झाले आहेत. एवढेच नव्हे तर मुंबईतील ९९ पैकी ८९ डायलिसिस सेंटरही सुरु झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तयारी दर्शवणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यांसह नर्सिग होम्सचे शटर उघडून रुग्ण सेवा सुरु केली, हा संशोधनाचा विषय आहे.

मुंबईतील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांची सेवा अनेक ठिकाणी सुरू न झाल्याने ‘नॉन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत असल्याने महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी अशाप्रकारच्या सेवा सुरु न झाल्यास त्यांच्याविरोधात कारवाईचे आदेश महापालिका आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार मुंबईतील १ हजार ४१६ ‘दवाखाने व नर्सिंग होम्स’ पैकी १ हजार ६८ (७५.४२ टक्के) एवढे सुरू झाले आहेत. शिवाय मुंबईतील ९९ डायलिसिस सेंटर पैकी ८९ सुरू झाले आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. एकट्या धारावीमध्ये ३५० खासगी दवाखाने आहेत आणि त्यांनी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांना पत्र देवून सोमवारपासून या सेवा सुरु करत असल्याचे आश्वासन दिले. मात्र, धारावीतील ६० फुट रस्त्यावरील डॉ. कैलास गौड यांचा दवाखाना अखंड सुरु होता. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता अशा काही डॉक्टर आपली सेवा कायम ठेवल्याचे दिसून येते.

मुंबईतील सुमारे ७५ टक्के ‘दवाखाने व नर्सिंग होम्स’ जरी चालू झाले असले, तरी उर्वरित सुमारे २५ टक्के सेवा अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. ‌त्यामुळे त्यानंतरही या सेवा सुरु न झाल्यास खासगी दवाखान्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ (साथरोग कायदा १८९७) नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश यापूर्वीच खात्याला दिले असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

First Published on: April 27, 2020 8:50 PM
Exit mobile version