रस्त्यावर गायी बांधून व्यवसाय करणाऱ्यांना झटका! १० हजार दंड!

रस्त्यावर गायी बांधून व्यवसाय करणाऱ्यांना झटका! १० हजार दंड!

अशा प्रकारे गायींना बांधून त्यांना चारा देण्याचा व्यवसाय मुंबईच्या रस्त्यांवर बिनबोभाटपणे सुरू आहे

मुंबईतील अनेक देवळे, मैदान आणि मोक्याच्या ठिकाणी गाई घेऊन काही महिला बसतात. गाईंना चारा देण्याच्या मोबदल्यात पैसे घेऊन त्या आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, गाईला बांधलेल्या ठिकाणी अस्वच्छता झाल्याचे आढळून आल्यास त्या गायी महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत जप्त करण्यात येतात. यापूर्वी बांधून ठेवलेल्या गायी पकडून नेल्यानंतर त्या सोडवण्यासाठी केवळ अडीच हजार रुपये एवढा दंड आकारला जायचा. मात्र, आता या दंडाच्या शुल्कात ३०० टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे गायीला पकडून नेल्यास ती सोडवण्यासाठी गायीच्या मालकाला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. चारा देण्यासाठी ज्या ठिकाणी गाई बांधल्या जातात, त्या ठिकाणी चार्‍याचा कचरा, शेण आणि गोमूत्र साचून अस्वच्छता होते. अशी अस्वच्छता झाल्यावर या गायी महापालिकेकडून जप्त केले जाते. त्यांना मग मालाड येथील कोंडवाड्यात ठेवले जाते. गायीगुरांना जप्त केल्यानंतर त्यांना मालाड येथे नेण्यासाठी महापालिका वाहन, कर्मचारीवर्ग, वाहनांचे इंधन आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. तो खर्च दंडाच्या स्वरुपातून वसूल केला जातो.


हेही वाचा – इस्कॉनला शिवडी क्षयरोग रुग्णालयात निविदा न काढताच कंत्राट!

सध्याचा दंड २५०० रुपये

कोंडवाड्यामार्फत पकडण्यात येणार्‍या मोठ्या जनावरांसाठी सध्या २५०० रुपये दंड आकारला जातो, तर लहान जनावरांसाठी १५०० रुपये दंडाची रक्कम आकारली जाते. मार्च २००४मध्ये महापालिकेने मंजूर केल्याप्रमाणे ही दंडाची रक्कम आकारली जाते. परंतु, आता या दंडाच्या रकमेत १५ वर्षांनी वाढ करण्याचा विचार असून पकडण्यात आलेल्या मोठ्या जनावरांसाठी १० हजार रुपये तर लहान जनावरांसाठी ६ हजार रुपये एवढी दंडाची रक्कम करण्यात येईल असे देवनार पशुवधगृहाच्या महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या मंजुरीनंतर दंड सुरू

ही वाढ करण्यासाठी प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवला असून त्या पडताळणीनंतर अतिरिक्त आयुक्त तसेच आयुक्तांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर महापालिकेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करून, सभागृहाच्या मान्यतेनंतर याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही देवनार पशुवधवगृहाच्या महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: July 29, 2019 7:28 AM
Exit mobile version