शाळेच्या इमारतीवरुन उडी घेऊन दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

शाळेच्या इमारतीवरुन उडी घेऊन दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

भिवंडी शहरातील नागाव सलामतपुरा परिसरातील एका ऊर्दू हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या ५व्या मजल्यावरून उडी देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारार्थ जे.जे. हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असता, वाटेतच त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान चाचणी परिक्षा संपल्यानंतर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पण विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, तिच्या पालकांच्या चौकशीत आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे शाळेचे रजिस्ट्रार अकिल शेख यांनी सांगितले.

उपचारासाठी जात असता रस्त्यातच मृत्यू

भिवंडी शहरातील फातमा नगर येथे राहणारी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही विद्यार्थिनी ‘अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूल’मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. शाळेत सध्या चाचणी परीक्षा सुरु असून आज इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होता. मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही सकाळी ७.३० वाजता शाळेत आली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील वर्ग खोलीत परीक्षेसाठी बसली. सकाळी ९.३० वाजता पेपर सुटल्यावर मुबशीरा पहिल्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर गेली. त्यानंतर सकाळी १० वाजता तेथील गॅलरीतून थेट खाली उडी मारुन तिने आत्महत्या केली. मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही थेट शाळेसमोरच्या पंटागणात जोरात आपटली. त्या वेळी काही विद्यार्थिनी वऱ्हांड्यात उभ्या असल्याने त्यांना जोरात काही तरी आदळल्याचा आवाज आला. त्यानंतर मुलींनी पटांगणात धाव घेतली. त्यानंतर तात्काळ शाळेतील शिपाई यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख हिला उचलून वंजारपट्टी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. परंतु त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यावर तिला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी प्रथमोपचार करुन तिला पुढील उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. परंतु उपचारासाठी जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – भिवंडीतील फॅक्टरीत भीषण आग

घटना शाळेच्या सीसीटीव्हीत कैद

मुलीच्या आत्महत्येची घटना शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या शाळेत घटक चाचणी परिक्षा सुरु आहे. पण या चाचणीचे विद्यार्थ्यांना दडपण असण्याचे कारण नाही. त्यामुळे कोणत्या दडपणाखाली सदर विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले? हे पालकांशी बोलल्यावरच स्पष्ट होईल असे शाळेचे रजिस्ट्रार अकिल शेख यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शांतीनगर पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले.

First Published on: August 21, 2019 7:01 PM
Exit mobile version