म्हाडाची राज्यात ११ हजार घरांची लॉटरी

म्हाडाची राज्यात ११ हजार घरांची लॉटरी

म्हाडा

राज्यातील विविध शहरांमध्ये एकूण ११ हजार घरांची लॉटरी म्हाडामार्फत काढण्यात येणार आहे. औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई अशा चारही शहरांमध्ये निवडणुकांपूर्वीच ही लॉटरीची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. कोकण मंडळातील ९ हजार ५०० घरांची किंमत सव्वा लाख ते दोन लाख २५ हजार रूपयांनी कमी करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याआधी कोकण मंडळात घर खरेदी केलेल्या ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे.

संपूर्ण राज्यातील विविध शहरांमध्ये म्हाडामार्फत लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबादमध्ये ९१७ घरे, पुण्यात सर्वाधिक अशी ४६६४ घरे, नाशिकमध्ये १११३ घरे, तर मुंबईत २३८ घरे अशी एकूण ६८०० घरांची लॉटरी म्हाडामार्फत काढण्यात येणार आहे. १५० गाळ्यांचा समावेशही या लॉटरी प्रक्रियेत असणार आहे. कोकण मंडळातील ४५०० घरांसाठीही लॉटरी निवडणुकीपूर्वी जाहीर होईल, अशी माहिती कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोकणात भंडारलीत १७४३ घरे, तर गोटेघर येथे २४५५ घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गोटेघर येथील घरे ही पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येतील, असे ते म्हणाले. आचारसंहितेआधीच या घरांच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोकण परिमंडलातील विरार बोळींज येथील घरे ही बाजारभावापेक्षा अधिक महागडी आहेत. मुंबईसारखीच सवलत या घरांसाठी मिळावी, अशी मागणी अर्जकर्त्यांकडून करण्यात येत होती. काल झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत विरार बोळींजच्या किमती कमी करण्याचा निर्णय झाला. रेडीरेकनरच्या दरामध्ये चौरस फुटामागे २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी १ लाख ३० हजार रुपये तर मध्यम उत्पन्न गटातील अर्जकर्त्यांसाठी २ लाख २५ हजार रुपये इतकी प्रत्येक घरामागे कपात करण्यात येणार आहे. एकूण ९८०० घर विकत घेतलेल्यांसाठी हा फायदा होईल. याआधी घराची किंमत मोजलेल्यांसाठीही या सवलतीचा फायदा मिळणार आहे. रक्कम भरलेली असली तरीही त्या रकमेचा परतावा मिळेल, असे पाटील म्हणाले.

First Published on: March 1, 2019 5:20 AM
Exit mobile version