अँटॉप हिलमधून १२ लाखांचा पानमसाला जप्त

अँटॉप हिलमधून १२ लाखांचा पानमसाला जप्त

दर्जाहीन खाद्यपदार्थांची साठवणूक आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई कायम आहे. अँटॉप हिल परिसरातून एफडीएने तब्बल १२ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला.

अँटॉप हिलमधील ट्रान्झीस्ट कॅम्प येथे प्रतिबंधित पानमसाल्याची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानुसार एफडीएने २१ डिसेंबरला अँटॉप हिल येथे छापा घातला. या छाप्यात रोहन तोडणकर ही व्यक्ती साठा आणि विक्री साठी प्रतिबंधित असलेले विमल पानमसाला, गोवा १०००, एस जी आर २००० गुटखा, नजर ९०,००० गुटखा, रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, राजश्री पानमसाला, एस.एच.के गुटखा, शुद्ध प्लस पानमसाला, कमला पसंद पानमसाला इत्यादी पदार्थांची विक्री करताना आढळून आला. एफडीएने हा सर्व साठा जप्त केला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत १२ लाख ९१ हजार ९५४ इतकी आहे. प्रतिबंधित साठ्यातील १८ नमुने विश्लेषणासाठी घेतले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे. रोहन तोडणकर विरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त बिभिषण मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत साबळे, संतोष सावंत, अविनाश भांडवलकर यांनी केल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शशिकांत केंकेर यांनी दिली.

First Published on: December 22, 2020 7:55 PM
Exit mobile version