मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो सीनिअर सिटिझन्स धावणार, ९१ वर्षीय आजी आणि ८९ वर्षीय आजोबांचीही नोंदणी

मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो सीनिअर सिटिझन्स धावणार, ९१ वर्षीय आजी आणि ८९ वर्षीय आजोबांचीही नोंदणी

Tata Mumbai Marathon | मुंबई – जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ ही स्पर्धा १५ जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात होणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या मुंबई मॅरेथॉनचे हे १८वे वर्ष आहे. दोन वर्षांच्या कालखंडानंतर या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याने अबालवृद्ध उत्सुक आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या मॅरेथॉनमध्ये धावण्याकरता १२६२ वरिष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे. हेल्पेज इंडिया या संस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या वीस मिनिटांत, सागरी महामार्ग नोव्हेंबरपासून होणार खुला

फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किमी, ड्रिम रन, सिनिअर सिटिझन रन आणि चॅम्पिअन्स विथ डिसअॅबिलिटी रन अशा वैशिष्ट्यांत यंदा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. तसेच, या वेळेस महिलांचा सहभाग वाढावा याकरता आयोजकांकडून काही जागा राखीवही ठेवण्यात आल्या आहेत. या वर्षी १२६२ वरिष्ठ नागरिकांनी नोंदणी केली असून त्यात ५४ टक्के पुरुष आणि ४६ टक्के महिला आहेत. उल्लेखनीय म्हणजे ९१ वर्षीय आजी आणि ८९ वर्षीय आजोबांनीही या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे. ३७५ वृद्धांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामुळे वरिष्ठ नागरिकही काळानुसार बदलत असल्याचं हे द्योतक आहे.

मुंबई मॅरेथॉनसाठी २ जानेवारी रोजी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी जवळपास ५५ हजार धावपटूंनी नोंदणी केली आहे. ‘हर दिल मुंबई’ असे यंदाच्या स्पर्धेचे ब्रीद वाक्य आहे.

First Published on: January 11, 2023 8:37 PM
Exit mobile version