विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १४ उमेदवारांनी भरले अर्ज

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १४ उमेदवारांनी भरले अर्ज

आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी दोन डमी उमेदवारांनी अर्ज भरल्याने उमेदवारांची संख्या १४ वर पोहचली आहे. प्राप्त अर्जाची उद्या (मंगळवार) दुपारी १२ वाजता छाननी केली जाईल. छाननीत अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर डमी उमेदवारांकडून माघार घेतली जाईल. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ मे अशी आहे.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला. गेली अनेक वर्ष शिवसेनेची धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांचा अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.

ठाकरे यांच्यसह शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

निवडणूक रिंगणातील उमेदवार

शिवसेना : उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस : शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे

काँग्रेस : राजेश राठोड

भाजप : गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते- पाटील, डॉ. अजित गोपछडे, संदीप लेले, रमेश कराड

अपक्ष : शेहबाज राठोड

First Published on: May 11, 2020 5:51 PM
Exit mobile version