दिवाळीदरम्यान मुंबईत आगीच्या १९६ घटना

दिवाळीदरम्यान मुंबईत आगीच्या १९६ घटना

दरवर्षी मुंबईत दिवाळीदरम्यान आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यंदाही दिवाळीच्या ५ दिवसात तब्बल १९६ आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ५० आगी या फक्त फटाक्यांमुळे लागल्या असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली. देशभरात ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दिपावलीचा सण साजरा करण्यात आला. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाकडे ६ नोव्हेंबरला ३१ आगीच्या घटना नोंद झाल्या. त्यापैकी ६ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्या. त्याचप्रमाणे ७ नोव्हेंबरला ५२ आगीच्या घटना त्यापैकी १६ ठिकाणी फटाक्यांमुळे, ८ नोव्हेंबरला ७४ घटनांपैकी १५ ठिकाणी फटाक्यांमुळे, ९ नोव्हेंबरला ३२ घटनांपैकी १२ ठिकाणी फटाक्यांमुळे तर १० नोव्हेंबरला ७ घटनांपैकी १ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्या आहेत.

लेव्हल एकच्या आगींचे प्रमाण जास्त 

एकंदरीत मुंबईत ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान लेव्हल एकच्या १९० आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यात ५० आगीच्या घटना या फटाक्यांमुळे नोंद झाल्या आहेत. तर लेव्हल २ च्या ५ ठिकाणी आणि लेव्हल ३ च्या एका ठिकाणी आग लागली होती. दिवाळीदरम्यान लागलेल्या बहुतेक आगी या लेव्हल एकच्या असल्याने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाने कळवले आहे. मुंबईत गेल्या ३ वर्षात फक्त दिवाळी दरम्यान फटाक्यांमुळे १७० ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०१६ मध्ये ८३, २०१७ मध्ये ३७ तर २०१८ मध्ये ५० आगीच्या घटना नोंद झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई हे गजबजलेलं आणि दाटीवाटीचं शहर आहे. त्यामुळे वारंवार लागणाऱ्या आगीची छळ सर्वसामान्यांना लागण्याची शक्यता जास्त आहे.

First Published on: November 13, 2018 1:14 PM
Exit mobile version