ठाण्यात आरटीईअंतर्गत दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड

ठाण्यात आरटीईअंतर्गत दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड

शाळांतील आगीची घटना रोखण्यासाठी पालिकेने केली 2.64 कोटींची तरतूद

ठाणे जिल्ह्यातील दुर्बल घटकातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी नुकतीच आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशासाठीची दुसरी ऑनलाईन फेरी पार पडली. या फेरीत दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १७ जून ते २७ जूनपर्यंत शाळा प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

राज्यातील कायम विना अनुदानित सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळांशी संलग्न शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाखा वगळून) आरटीई अंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यातील शाळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून पटसंख्येची उपलब्धता जाहीर केली. तसेच पालकांनीही ऑनलाईन पद्धतीने आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल केले होते.

१७ जून ते २७ जून या कालावधीत प्रवेश घेणे बंधनकारक

पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ तीन हजार ९६७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. त्यात १५ जून रोजी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गासाठी एक हजार ९८८ तर पूर्व प्राथमिकसाठी ६५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना १७ जून ते २७ जून या कालावधीत शाळा प्रवेश घेणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्यांचा पुढील फेरीत विचार केला जाणार नाही.

प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे सोबत घेवून जावे

दरम्यान, अर्जदारांना मोबाईलवर संदेश आला नसेल, त्यांनी स्वत:च्या लॉगीनमधील ‘अ‍ॅडमिट कार्ड’ या ऑप्शनमध्ये जाऊन ते प्राप्त करुन घ्यावे. तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे. शाळा प्रवेशासंबंधीत काही तक्रारी असल्यास याच काळात संबंधित तालुका आणि जिल्हा परिषद ठाणे येथे शिक्षण विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेली तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

First Published on: June 17, 2019 5:43 PM
Exit mobile version