गुटखा विक्री करणार्‍या 20 जणांवर गुन्हा

गुटखा विक्री करणार्‍या 20 जणांवर गुन्हा

Gutkha

रायगड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अनधिकृतपणे विक्री करणार्‍या 20 जणांविरुध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. त्या २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विभागाकडून यापूर्वी कठोर कारवाई करून अशा अवैध मालाच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घालण्याबाबत विक्रेत्यांना आवाहन करण्यात आलेले होते. तरीसुध्दा काही इसम अलिबाग व परिसरात तसेच शाळा, महाविद्यालयांनजीक असलेल्या लहान-मोठ्या दुकानांतून अशा मालाची छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना दिले होते.

त्याप्रमाणे शेख यांनी त्यांच्या खबर्‍यामार्फत शहर व परिसरात अशा प्रकारे गुटख्याची अनधिकृतपणे विक्री करणार्‍या इसमांबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एपीआय एस. व्ही. सस्ते, पीएसआय ए. जी. वळसंग आणि 30 पोलीस कर्मचारी यांचे खास पथक नेमून त्यांना संकलित केलेली माहिती दिली आणि करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शन केले.

पथकाने 15 एप्रिल रोजी रोजी लहान-मोठ्या दुकानांवर कारवाई केली असता एकूण 19 दुकानांमध्ये 1 लाख 11 हजार 418 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. हा माल जप्त करून एकूण 18 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दुकानदारांना गुटख्याचा पुरवठा कोण करतो, याची सध्या कसून चौकशी केली जात आहे. गुटखा विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

First Published on: April 17, 2019 4:32 AM
Exit mobile version